मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रझाक यांना आज (मंगळवार) राज्य विकास निधी भ्रष्टाचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. मलेशियातील भ्रष्टाचार विरोधी आयोगाने (एमएसीसी) नजीब रझाक यांच्या अटकेला दुजोरा दिला आहे. माजी पंतप्रधानांना अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

वर्ष २००९ मध्ये नजीब यांनीच स्थापन केलेल्या निधीत ७० कोटी डॉलरचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. एमएसीसीने म्हटले की, नजीब यांना बुधवारी कौलालंपूर न्यायालयात उभे केले जाणार आहे. मे महिन्यात पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांच्याकडून नजीब यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हापासूनच त्यांच्याविरोधात चौकशीचे सत्र सुरू झाले होते. दरम्यान, नजीब यांनी गैरप्रकार केल्याचा आरोप फेटाळला आहे.

माझ्या संपत्तीवर टाकण्यात आलेल्या धाडीदरम्यान पोलिसांनी जप्त केलेले दागिने आणि दुसऱ्या साहित्यांची किमती या वाढवून दाखवल्याचा आरोप यापूर्वी २८ जून रोजी नजीब रझाक यांनी केला होता.