इजिप्तच्या जनतेने अध्यक्षीय निवडणुकीत मतदान केले आहे. त्यात लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या नेत्यास पदच्युत करणारे व इस्लामी चळवळ चिरडणारे माजी लष्करप्रमुख या अब्देल फताह अल सिसी यांना मोठे यश मिळण्याची चिन्हे आहेत.
इस्लामी अध्यक्ष महंमद मोर्सी यांना जुलैत पदच्युत केल्यानंतर प्रथमच होत असलेल्या दोन दिवसांच्या निवडणुकीत सिसी यांनी आघाडी घेतली आहे. मोर्सी यांच्या मुस्लिम ब्रदरहूड पक्षाने मतदानावर बहिष्कार टाकला होता. ५९ वर्षे वयाचे निवृत्त फील्ड मार्शल असलेले अब्देल फताह अल सिसी हे त्यांचे डावे प्रतिस्पर्धी हमदीन सबाही यांना पराभूत करण्याची शक्यता अधिक आहे.
लोकांनी देशातील स्थिरतेसाठी कौल दिल्याचे मानले जाते. सोमवारी मतदान सुरू होताच सिसी यांनी मतदान केले त्या वेळी त्यांचे समर्थक व पत्रकार मोठय़ा संख्येने उपस्थित होते. इजिप्तमध्ये ५.३० कोटी पात्र मतदार आहेत. सिसी यांनी सांगितले, की सगळे जग आपल्याकडे इजिप्शियन लोक त्यांचा इतिहास व भविष्य कशा प्रकारे लिहित आहेत यादृष्टीने पाहात आहेत. उद्याचा काळ हा सुंदर व महान असेल असे त्यांनी समर्थकांच्या गर्दीत हात हलवून सांगितले. अरब स्प्रिंगने आश्वासन दिलेले स्वातंत्र्य व सिसी यांनी दिलेले देशातील स्थिरतेचे आश्वासन यात लोकांनी स्थिरतेला महत्त्व दिले आहे.
अरब स्प्रिंगच्या वेळी इजिप्तमध्ये ज्येष्ठ नेते होस्नी मुबारक यांना २०११ मध्ये पदच्युत करण्यात आले होते. अरब क्रांतीनंतर मोर्सी यांचे सरकार एक वर्ष टिकले ते अध्यक्षीय लोकशाही निवडणुकीच्या माध्यमातून निवड झालेले पहिले नेते  होते.
सिसी यांनी सांगितले, की खरी लोकशाही दोन दशकांत स्थापन होईल, पण आपण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणारी निदर्शने खपवून घेणार नाही व मुबारक यांच्यानंतर प्रत्येक निवडणूक जिंकणाऱ्या ब्रदरहूडला आम्ही नष्ट करू.