उत्तर प्रदेशातील हत्यासत्र थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. उत्तर प्रदेशातील हत्याकांडांची मालिका वाढतच चालल्याचं चित्र असून, तीन वेळा आमदार राहिलेल्या निर्वेंद्र मिश्रा यांची हत्या करण्यात आली आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

माजी आमदार निर्वेंद्र मिश्रा यांचा लखीमपूर खीरी येथे बेदम मारहाणीत मृत्यू झाला. मिश्रा आणि विरोधी गटात जमिनीचा वाद होता. रविवारी दोन्ही गटात जमिनीवरून किरकोळ वाद सुरू झाला. त्यानंतर वाद शिगेला गेल्यानंतर हाणामारी सुरू झाली. यात मिश्रा यांना बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या मिश्रा यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

या वादात मिश्रा यांचा मुलगाही जखमी झाला असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिश्रा हे तीन वेळा आमदार होते. दोन वेळा ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. मिश्रा यांच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

या घटनेनंतर बहुजन समाजवादी पक्षाच्या नेत्या मायावती यांनी योगी सरकारकडे कडक कारवाई कऱण्याची मागमी केली आहे. “उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरीचे माजी आमदार निर्वेंद्र कुमार मिश्रा उर्फ मुन्ना यांची निर्दयीपणे केलेली हत्या व याच जिल्ह्यातील विद्यार्थीनीसोबत अत्याचार केल्यानंतर गळफास देऊन केलेला खून, या दोन्ही घटना अति वेदनादायी व चिंताजनक आहेत. सरकारनं दोषीविरोधात कडक कारवाई करावी, जेणेकरून राज्यात होत असलेल्या घटनांना आळा बसेल,” असं मायावती यांनी म्हटलं आहे.

मिश्रा यांच्या हत्येनंतर काँग्रेसच्या नेत्या आराधना मिश्रा यांनी संताप व्यक्त केला. “आता तर हद्दच झाली आहे. आणखी एका ब्राह्मणाची हत्या झाली आहे. लखीमपूरचे तीन वेळा आमदार राहिलेल्या निर्वेंद्र मिश्रा यांची हत्या करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात जंगलराज भयावह झाला आहे. योगी सरकार झोपा काढत आहे. यूपीमध्ये ब्राह्मण असणं पाप आहे का?,” असं आराधना मिश्रा यांनी म्हटलं आहे.