एकेकाळी एअरहोस्टेस आणि मॉडेल म्हणून काम करणाऱ्या संगिता चॅटर्जीने आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेल्या तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. रक्तचंदनाच्या तस्करी प्रकरणात संगिता चॅटर्जीला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे त्याचप्रमाणे याप्रकरणी संगिता चॅटर्जीला अद्याप जामीनही मिळू शकलेला नाही त्याचमुळे वैफल्यग्रस्त झालेल्या संगिताने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संगिता चॅटर्जीने स्वच्छतागृहात ठेवलेले फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांना हे समजताच संगिता चॅटर्जीला चित्तूरच्या सरकारी रूग्णालयत दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती आता बरी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

‘मिड डे’ या दैनिकाने दिलेल्या बातमीनुसार, मार्च २०१७ मध्येच संगिता चॅटर्जीला रक्तचंदनाच्या तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली होती. एम लक्ष्मण या कुख्यात चंदन तस्कराची संगिता चॅटर्जी ही दुसरी बायको असल्याचीही माहिती समोर आली आहे. रक्तचंदनाच्या तस्करीप्रकरणी लक्ष्मणला नेपाळहून अटक करण्यात आली आहे. संगिता चॅटर्जीने एअरहोस्टेस म्हणून काम करण्यास सुरूवात केली होती, त्याचवेळी कोलकातामध्ये तिची आणि लक्ष्मणची भेट झाली. त्यानंतर या दोघांनी लग्न केले.

२०१४ मध्ये लक्ष्मणला अटक करण्यात आल्यानंतर रक्तचंदनाच्या तस्करीची सगळी सूत्रे संगिताने  हाती घेतली होती. त्यानंतर यावर्षी म्हणजेच मार्च २०१७ मध्ये संगिताला अटक करण्यात आली. देशातील सहा राज्यांमध्ये रक्तचंदनाची तस्करी केल्याचा आरोप संगितावर आहे. तसेच जपान आणि चीनमध्येही संगिताने तस्करी केल्याचा संशय पोलिसांना आहे. आता या सगळ्या प्रकरणात अडकलेली संगिता वैफल्यग्रस्त झाल्यामुळे तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.