20 January 2019

News Flash

राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सर जितेंद्र मानची राहत्या घरी गोळ्या घालून हत्या

अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल

राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सर जितेंद्र मान याची राहत्या घरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

ग्रेटर नोयडा : हरयाणा स्टेट बॉक्सिंग असोसिएशनचा सदस्य असलेला राष्ट्रीय स्तरावरील माजी खेळाडू जितेंद्र मान याची राहत्या घरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोयडा येथील फ्लॅटमध्ये तो रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, जितेंद्र मान (वय २७) हो ग्रेटर नोयडात जीम ट्रेनर म्हणून काम करीत होता. त्याचा माजी रुममेट प्रितम सिंग याने त्याच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पाहिले त्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली. जितेंद्रची दोन गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

घटनास्थळी सीसीटीव्ही बसवलेले नसल्याने मारेकऱ्यांना शोधण्यात अडचणी येत आहेत. मात्र, शवविच्छेदनाचा अहवाल आणि जितेंद्रच्या फोन कॉल्सची माहिती यावरुन त्याच्या मृत्यूचे कारण आणि आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

जितेंद्रच्या कुटुंबियांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मात्र, तक्रारीत त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. आयपीसी सेक्शन ३०२ अंतर्गत याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर सुरजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतमबुद्ध नगर जिल्ह्याचे उपअधिक्षक अमित श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली.

जितेंद्रच्या कुटुंबियांच्या माहितीनुसार, जितेंद्र मान हा राष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंग खेळला आहे. त्याचबरोबर परदेशातील स्पर्धांमध्ये त्यांने सहभाग घेतला होता. त्याचे कुटुंबिय दिल्लीतील अलिपूर भागात राहतात. मात्र, तो सध्या ग्रेटर नोयडातील एव्हीजे हाईट्स सोसायटीतील सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. पोलिस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

First Published on January 13, 2018 12:21 pm

Web Title: former national level boxer found dead in greater noida flat