ओडिशाचे माजी मुख्यमंत्री व आसामचे माजी राज्यपाल जानकी वल्लभ पटनाईक (वय ८९) यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तिरूमला येथे व्यंकटेश्वर मंदिरात प्रार्थना केल्यानंतर लगेच काही तासातच त्यांचे निधन झाले.
पटनाईक हे येथे राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाच्या पदवीदानाच्या कार्यक्रमासाठी आले होते.
पटनायक हे तीन वेळा ओडिशाचे मुख्यमंत्री होते. ओडिशा सरकारने  त्यांच्या निधनामुळे एक आठवडय़ाचा दुखवटा जाहीर केला.
जानकी वल्लभ पटनाईक हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते व त्यांनी साहित्य व संस्कृतीत योगदान दिले होते. त्यांचा जन्म ३ जानेवारी १९२७ रोजी झाला. १९८० ते १९८९ दरम्यान ते ओडिशाचे मुख्यमंत्री होते. १९९५ मध्ये ते पुन्हा सत्तेवर आले व नंतर १९९९ पर्यंत मुख्यमंत्री राहिले. ते केंद्रात कॅबिनेट मंत्रीही होते व नंतर २००९ मध्ये आसामचे राज्यपाल झाले. त्यांचे शिक्षण खुर्दा हायस्कूल येथे झाले. १९४७ मध्ये त्यांनी उत्कल विद्यापीठातून संस्कृतमध्ये बीए केले व नंतर बनारस हिंदू विद्यापीठातून १९४९ मध्ये राज्यशास्त्रात एमए केले.