ओडिशाचे माजी मुख्यमंत्री जानकीबल्लभ पटनाईक यांना आज हजारो लोकांनी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. त्यांची अंत्ययात्रा शहरातून काढण्यात आली होती. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद, अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी व पत्रकार या वेळी उपस्थित होते. पटनाईक यांचे पार्थिव काही काळ ओडिशा विधानसभेच्या आवारात व काँग्रेस भवनात ठेवण्यात आले होते.
ओडिशाचे विधानसभा अध्यक्ष निरंजन पुजारी, विरोधी पक्षनेते नरसिंघा मिश्रा, संसदीय कामकाजमंत्री बी.के.अरूख व अनेक आमदारांनी त्यांना पुष्पांजली वाहिली. जे.बी.पटनाईक यांचे तिरूपती येथे काल पहाटे निधन झाले होते.
त्यांचे पार्थिव खुर्दा येथील मूळगावी नेण्यात आले व नंतर ते पुरी येथील ‘स्वर्गद्वार’ येथे नंतर नेले जाईल. पटनाईक यांना श्रद्धांजली वाहताना गुलाम नबी आझाद यांनी सांगितले, की पटनाईक यांच्या निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. आझाद हे आज सकाळी पटनाईक यांच्या निवासस्थानी आले. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या वतीने त्यांनी श्रद्धांजली वाहिली व पटनाईक यांच्या पत्नीला सोनिया गांधी यांनी पाठवलेला शोकसंदेश दिला.