गेल्या काही दिवसांपूर्वी तिसरं लग्न केल्यामुळे चर्चेत असलेले पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्‍तान तहरीक-ए-इंसाफ (PTI) या पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान पुन्हा एकदा चर्चेत आहेत. पाकिस्तानच्या सोशल मीडियामध्ये सध्या इम्रान खान यांचा भगवान शंकराच्या रूपातला फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पाकमधील हिंदूंनी याचा निषेध केलाय. दुसरीकडे, इम्रान यांचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या रस्त्यापासून संसदेपर्यंत या फोटोवरुन टीका होत आहे.

‘बीबीसी’च्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या संसदेतही या मुद्द्यावरून गदारोळ झाला त्यानंतर पाकिस्तानच्या संसदेने चौकशीचे आदेश दिले आहेत. हा फोटो एका फेसबुक पेजवर 8 एप्रिल रोजी पोस्ट करण्यात आला होता, पण मोठ्या प्रमाणात राजकारण तापल्यानंतर फेसबुक पेज ब्लॉक करण्यात आलं आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) रमेश लाल यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलं आहे. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणात गृहमंत्री तलाल चौधरी यांना तातडीने अहवाल सोपावण्यास सांगण्यात आलं आहे.