भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपाचे दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मात्र वाजपेयी यांनी श्रद्धांजली अर्पण करताना दिग्विजय यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे. त्यांनी सोमवारी (१७ ऑगस्ट २०२० रोजी) एक ट्विट केलं आहे. “अटलजींचा लोकशाहीवर विश्वास होता. संघात (राष्ट्रीय स्वयंसेवक संघात) असूनही ते नेहरुवादी होते. त्यांना मी नमन करतो,” असं एक ट्विट दिग्विजय यांनी केलं आहे. तर दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी, “मोदी आणि शाहजी कुठे तुमचे विचार आणि कुठे अटलजींचे विचार. एकदम विरोधी. ते लोकशाहीचे पुजारी होते आणि तुम्ही देशाला एकाधिकारशाहीकडे घेऊन चालला आहात,” असा टोला लगावला आहे.

मोदी आणि शाह यांच्यावर टीका करताना दिग्विजय यांनी वाजपेयी यांचा जुना व्हिडिओही शेअर केला आहे. “देशाला स्थिर सरकार हवं आहे मात्र त्याचवेळी प्रश्नांना उत्तर देणारं सरकारही हवं आहे. जर सरकार स्थिर असेल पण भ्रष्ट असेल, जर ते सदस्यांना (खासदारांना) विकत घेऊन बहुमताचा आकडा दाखवत असेल किंवा इतर प्रकारे लाच देऊन त्यांचे समर्थन घेत असेल तर ती संख्या स्थिर नसणार. लोकशाही असेल तर ती नैतिकतेच्या आधारावर असावी,” असं या व्हिडिओमध्ये अटलजी सांगताना दिसत आहेत.

दिग्वीजय यांच्या या ट्विटवरुन अनेकांनी त्यांच्यावर टीका केल्याचे प्रतिक्रियांमध्ये पहायला मिळत आहे. अनेकांनी वाजपेयी नेहरुवादी नव्हते असं म्हटलं आहे. तर काहींनी काँग्रेसच्या राजकारणामुळे भारताने वाजपेयींसारखे चांगले नेतृत्व प्रदीर्घकाळ देशाचे नेतृत्व करु शकले नाही अशी टीका केली आहे.