माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यापुढील निवडणुकांमध्ये मतदान करु शकणार नाहीत. अनेक वर्षांपासून लखनऊला न आल्याने वाजपेयींचे नाव मतदार यादीतून हटवण्यात आले आहे. वाजपेयी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील बनारसी दास वॉर्डमधून मतदानाचा हक्क बजावायचे. त्यांनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदान केले होते. मात्र त्यानंतर प्रकृती अस्वाथ्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही.

‘अटल बिहारी वाजपेयी यांनी महानगरपालिकेला बनारसी दास भागातील पत्ता दिला आहे. मात्र त्या पत्त्यावर ते अनेक वर्षांपासून राहत नाही. त्यामुळेच मतदारांची पडताळणी केल्यावर त्यांचे नाव मतदारयादीतून हटवण्यात आले,’ अशी माहिती महानगरपालिकेचे विभागीय अधिकारी अशोक कुमार सिंह यांनी दिली. वाजपेयींनी दिलेल्या पत्त्यावर सध्या किसान संघाचे कार्यालय आहे. मतदारयादीतील पत्त्यानुसार वाजपेयी लखनऊमधील बासमंडी येथील घर क्रमांक ९२/९८-१ या ठिकाणी वास्तव्यास होते. त्यांचा मतदार क्रमांक १०५४ होता. मात्र विभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाजपेयी गेल्या १० वर्षांपासून शहरात आलेले नाहीत.

अटल बिहारी वाजपेयी यांनी २००० साली झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला होता. त्यावेळी ते पंतप्रधानपदी होते. यानंतर त्यांनी कधीही महापालिका निवडणुकीत मतदान केले नाही. २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांनी शेवटचे मतदान केले. प्रकृतीच्या तक्रारींमुळे वाजपेयी गेल्या अनेक वर्षांपासून लखनऊमध्ये आलेले नाहीत. सध्या ते ल्युटन्स झोनमधील ६-ए कृष्ण मेनन मार्गावर राहतात.