मालदीवचे माजी अध्यक्ष मोहम्मद नशीद यांच्याविरोधात मालदीवच्या न्यायालयाने अटक वॉरण्ट जारी केले असून मालेमधील भारतीय दूतावासाने आपल्याला आश्रय द्यावा, अशी विनंती नाशीद यांनी केली आहे. हे वॉरण्ट जारी करण्यात आल्यानंतर नशीद हे तातडीने भारतीय दूतावासाकडे रवानाही झाले. आपली सुरक्षा आणि हिंदी महासागरातील एकूण स्थैर्यासाठी आपण मालदीवमधील भारतीय दूतावासाचा आश्रय घेतल्याचे नशीद यांनी ट्विटरवर नमूद केले. नशीद यांनी दूतावासात आश्रय मागितल्याची बाब नवी दिल्लीतील सूत्रांनी मान्य केली. या मुद्दय़ावर पुढील निर्णय घेण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तसेच परराष्ट्र सचिवांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनेक बैठका घेतल्याचे वृत्त आहे. आपल्या अटक वॉरण्टला स्थगिती मिळण्यासाठीही नशीद यांनी न्यायालयात धाव घेतली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हुलहुमाले येथील दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात नशीद यांच्याविरोधातील खटल्याची सुनावणी सुरू असून त्यासाठी त्यांनी १० फेब्रुवारी रोजी उपस्थित रहावे, असे त्यांना सांगण्यात आले होते. परंतु त्या दिवशी ते सुनावणीसाठी उपस्थित राहिले नाहीत.