17 January 2021

News Flash

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन

त्यांच्या निधनानिमित्त सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे

(संग्रहित छायाचित्र)

माजी राष्ट्रपती, मुरब्बी राजकारणी, काँग्रेसचे संकटमोचक नेते, भारतरत्न प्रणब मुखर्जी यांचे सोमवारी लष्कराच्या रुग्णालयात निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानिमित्त सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

मुखर्जी यांचे पुत्र अभिजित यांनी ट्वीटद्वारे प्रणबदांच्या मृत्यूचे वृत्त दिले. प्रणब मुखर्जी यांना १० ऑगस्ट रोजी दिल्लीतील लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल (आर.आर.) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूत रक्ताची गाठ तयार झाल्याचे निष्पन्न होताच त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना करोनाचा संसर्ग झाला होता. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करत होते. त्यांची प्रकृती मंगळवारनंतर अधिक खालावत गेली. ते कोमात गेल्याने त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रावर ठेवले होते. त्यांच्या फुप्फुसातही संसर्ग झाला होता. प्रणबदांची प्राणज्योत सोमवारी संध्याकाळी मालवली.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निष्ठावान राहिलेल्या प्रणबदांना राजकीय आयुष्याच्या अखेपर्यंत पंतप्रधानपदाने हुलकावणी दिली मात्र, त्यांना देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर बसण्याचा बहुमान मिळाला. ते २०१२ मध्ये १३वे राष्ट्रपती बनले. त्यांच्या राष्ट्रपतिपदाच्या कालखंडात मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील दोषी अजमल कसाब, संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफजल गुरू, १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेनन यांना फाशी दिले गेले. त्यांच्याकडे आलेल्या माफी याचिकांपैकी २८ दोषींच्या फाशीची शिक्षा कायम ठेवली, तर चार दोषींची फाशी जन्मपेठेत रूपांतरित केली होती.

साठ वर्षांचा राजकीय अनुभव असलेल्या प्रणब मुखर्जी यांना केंद्रातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित केले. राष्ट्रपतिपदाचा कार्यकाल संपल्यानंतर प्रणब मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमातही सहभागी झाले होते. त्यांनी संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांना ‘भारताचा महान सुपुत्र’ असे संबोधले होते. या कार्यक्रमात त्यांनी देशाच्या बहुविध नागरी संस्कृतीचा आणि एकात्म परंपरेचा विशेष उल्लेख केला होता. प्रणब मुखर्जी संघाच्या व्यासपीठावर गेल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती.

इंदिरा गांधींनी १९६९ मध्ये प्रणबदा यांना राज्यसभेवर पाठवले आणि मंत्रिमंडळातही त्यांचा समावेश केला. आणीबाणीचा काळही प्रणबदांनी सत्तेत राहून पाहिला होता. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर पंतप्रधान होण्याची अभिलाषा त्यांनी बाळगली होती. मात्र, काँग्रेसजनांनी राजीव गांधी यांना पंतप्रधान बनवण्याचा आग्रह धरला. राजीव गांधी यांना राजकीय अनुभव नसल्याने त्यांना पंतप्रधान करण्यास प्रणबदांचा विरोध होता. त्यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस पक्ष काढला होता, पण ते काँग्रेसमध्ये परतले. सोनिया गांधी यांना पक्षाध्यक्ष बनवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता, तरीही राजीव गांधींना विरोध केल्यामुळे गांधीनिष्ठावानांमध्ये त्यांचा समावेश केला गेला नाही.

सोनिया गांधींनी पंतप्रधानपदी मनमोहन सिंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. तरीही प्रणबदांकडे असलेला राजकीय चाणाक्षपणा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वास्तवाचे भान, वैचारिक स्पष्टता, वाचन आणि आकलनक्षमता या सर्व गुणांचा सोनिया गांधींनी २००४ मध्ये स्थापन झालेल्या संयुक्त लोकशाही आघाडी सरकारच्या काळात उपयोग करून घेतला. आघाडी, सरकार वा पक्षावर आलेल्या कोणत्याही संकटावर मात करण्याचे काम प्रामुख्याने प्रणबदांना करावे लागत असे. त्यामुळे त्यांना ‘संकटमोचक’ मानले जात असे. प्रणबदा नसते तर ‘यूपीए’चे सरकार टिकले नसते, अशी मार्मिक प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी संसदेत दिली होती.

इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि मनमोहन सिंग या तीन पंतप्रधानांची कारकीर्द प्रणबदांनी मंत्री या नात्याने जवळून पाहिली. २००४ पासून २०१२ पर्यंत ते मनमोहन सिंग सरकारमध्ये ते दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री होते. त्यांनी परराष्ट्र, अर्थ, संरक्षण अशा महत्त्वाच्या मंत्रिपदांचा कारभार सांभाळला होता. १९९१ नंतर खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि नियोजित अर्थव्यवस्थेत अर्थमंत्रिपद भूषवणारे प्रणबदा हे एकमेव केंद्रीय मंत्री होते. वयाच्या ३५व्या वर्षी राज्यसभेचे सदस्य बनलेले प्रणब मुखर्जी २००४ मध्ये पश्चिम बंगालमधील जंगीपूर मतदारसंघातून निवडून आले आणि पहिल्यांदा लोकसभेचे सदस्य बनले. सलग २३ वर्षे ते काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य होते.

प्रणब मुखर्जी यांनी पाच दशके समर्पित भावनेने देशसेवा केली. सार्वजनिक जीवनात विविध पदांवर कार्यरत असताना त्यांनी मातीशी नाळ कायम ठेवली. त्यांच्या निधनाने एका पर्वाचा अस्त झाला आहे.

– रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

प्रणब मुखर्जीच्या निधनाने देशाने एक बुद्धिमान, सर्वपक्षीय मान्यता लाभलेला नेता गमावला आहे. भारताच्या विकासपथावर त्यांनी अमीट ठसा उमटवला आहे.

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 12:10 am

Web Title: former president pranab mukherjee passes away abn 97
Next Stories
1 ‘..त्या डॉक्टरांना सशस्त्र दलातील शहिदांचा दर्जा द्यावा’
2 दिल्लीत लोकांच्या निष्काळजीमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ 
3 प्रणव मुखर्जींच्या जाण्याने संघाचं कधीही न भरुन येणारं नुकसान झालंय : सरसंघचालक
Just Now!
X