News Flash

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जयंती: जाणून घ्या कोणते होते त्यांचे ५ महत्त्वपूर्ण निर्णय

वाजपेयी यांनी पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.

देशाच्या राजकीय वाटचालीत अनेक मोठे नेते होऊन गेले. परंतु त्या सर्वामध्ये आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये एक ठळक मूलभूत फरक होता. अटलजी अस्सल कविमनाचे कलाकार व्यक्ती होते. एक कलाकार जेव्हा राजकारणासारख्या तुलनेने वेगळ्या आणि कोरड्या क्षेत्रात येतो तेव्हा त्या व्यक्तीला आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वामध्ये बदल करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. मुत्सद्दी राजकारणी, त्यासाठी आवश्यक असलेला ‘अ‍ॅटिटय़ूड’, डावपेच अंगीकारण्यासाठी अटलजींनी प्रचंड मेहनत घेतली आणि त्या मेहनतीला आलेलं यश वेळोवेळी आपण बघितलं! संघ, जनसंघ आणि त्यानंतर भाजप या संघटनांची विचारधारा, त्यांची पार्श्वभूमी, त्यांचं राजकारण हे सगळंच खरं तर अटलजींच्या मूळ कलाकार म्हणून असलेल्या व्यक्तिमत्त्वाशी काहीसं विसंगतच. पण अटलजींनी हे आव्हान समर्थपणे पेललं!

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज ९५ वी जयंती आहे. देशाच्या विकासात अटल बिहारी वाजपेयी यांचा मोलाचा वाटा आहे. तसंच केवळ दोन जागांवर विजय मिळवणाऱ्या भाजापाला मोठं यश मिळवून देण्याचं श्रेयही त्यांनाच जातं. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. जाणून घेऊ त्यातील पाच महत्त्वाचे निर्णय.

अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात रस्त्यांच्या माध्यमातून देशाला जोडण्याचं काम केलं होतं. त्याचा फायदा आजही देशवासीयांना होत आहे. त्यांनी चेन्नई, कोलकाता, दिल्ली आणि मुंबईला जोडण्यासाठी ‘स्वर्णिम चतुर्भूज रस्ता प्रकल्प’ ही योजना लागू केली. तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी ‘पंतप्रधान ग्रामिण रस्ते विकास’ योजना लागू केली. त्यांच्या या निर्णयामुळे देशाच्या आर्थिक विकासातही भर पडली.

माजी पंतप्रधान राजीव गांधी हे भारतातील दूरसंचार क्रांतीचे जनक मानले जातात. परंतु या क्रांतीचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण काम वाजपेयी यांनी आपल्या कार्यकाळात केलं. १९९९ मध्ये त्यांनी बीएसएनएलच्या मक्तेदारीला संपवून नवं टेलिकॉम धोरण लागू केलं.

६ ते १४ वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचं काम अटल बिहारी वाजपेयी यांच्याच कार्यकाळात सुरू करण्यात आलं. २००० ते २००१ या कालावधीत हे अभियान राबवण्यात आलं. यानंतर मधूनच शिक्षण सोडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली होती. या अभियानाचे चांगले परिणाम आजही पहायला मिळतात.

मे १९९८ मध्ये भारताने पोखरणमध्ये अणुचाचणी घेतली होती. १९७४ नंतर भारताने केलेली ही अणुचाचणी होती. भारत हादेखील अण्विक शक्ती असलेला देश आहे हे दाखवून देण्यासाठी ही अणुचाचणी करण्यात आली होती. त्यांच्या या निर्णयाचा अनेक स्तरातून विरोध झाला. मात्र, या चाचणीनंतर भारत एक शक्तीशाली देश म्हणून जगाच्या समोर आला.

आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात वाजपेयी यांनी भारत पाकिस्तान या देशांमधील संबंध सुधारण्यासाठी अनेक मोलाचे प्रयत्न केले. फेब्रुवारी १९९९ मध्ये त्यांनी दिल्ली-लाहोर ही बससेवा सुरू केली. पहिल्या बसमधून ते स्वत: लाहोरला गेले होते. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली होती. पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी हा निर्णय घेतला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2019 8:29 am

Web Title: former prime minister atal bihari vajpayee anniversary know his five big decision jud 87
Next Stories
1 राहुल गांधी, प्रियांका गांधी हे पेट्रोल बॉम्ब; भाजपा नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
2 अमित शहांचे घूमजाव!
3 आता राष्ट्रीय लोकसंख्या सूची अद्ययावत करण्याचा संकल्प
Just Now!
X