माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना रविवारी रात्री एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना त्वरित एम्स रुग्णालयात नेण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

रविवारी रात्री छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर डॉ. मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली. “मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीबाबत मी चिंतीत आहे. ते लवकर बरे होतील अशी मी अपेक्षा करतो. संपूर्ण देश त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे,” असं ते म्हणाले होते.

“मी संर्व भारतीयांसह मनमोहन सिंग यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना करतो. तसंच त्यांना उत्तम आरोग्य लाभो,” अशा आशयाचं ट्विट कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी केलं होतं. याव्यतिरिक्त अनेक नेत्यांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. “माजी पंतप्रधान मनमोहन सिंग एम्समध्ये दाखल झाले आहेत हे ऐकून मी चिंतीत झालो आहे. परंतु ते आयसीयूमध्ये नाहीत आणि त्यांची प्रकृती ठीक आहे हे ऐकून बरं वाटलं. लवकरच ते पूर्णपणे बरे होतील अशी प्रार्थना करतो,” असं ट्विट शशी थरूर यांनी केलं होतं. तर दुसरीकडे शिवसेना नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीदेखील त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना केली.