काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सैफुद्दीन सोझ यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बहिष्कार घातल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सैफुद्दीन सोझ हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. सोझ हे यूपीए सरकारमध्ये मंत्री होते. जम्मू काश्मीरचे ते मोठे नेते आहेत. सोझ यांनी काश्मीरच्या इतिहास आणि वर्तमानाशी निगडीत एक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यालावरच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बहिष्कार घातला आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

काश्मीरच्या लोकांची प्राथमिकता ही स्वातंत्र्य मिळवणे आहे, सध्याच्या स्थितीत काश्मीरशी निगडीत देशांमुळे हे शक्य होणार नाही. असे वक्तव्य त्यांनी केले होते ज्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. तसेच काश्मीरचे लोक पाकिस्तानात त्यांचे विलिनीकरण करू इच्छित नाही असेही त्यांनी म्हटले होते. सोझ यांनी केलेल्या वक्तव्याचा राजकीय वर्तुळातून निषेध करण्यात आला. सोझ यांना पाकिस्तानचा पुळका असेल तर त्यांनी खुशाल पाकिस्तानात जावे असा सल्लाही शिवसेनेने दिला. या वक्त्यावरून सुरू झालेला वाद शमतो न शमतो तोच शनिवारी त्यांनी पुन्हा एक वादग्रस्त केले.

पाकव्याप्त काश्मीर अण्वस्त्र युद्ध केल्याशिवाय भारताला मिळणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. या वक्तव्यावरूनही बराच वाद निर्माण झाला होता. भाजपाने काँग्रेसला धारेवर धरत देशाबाहेर एक पाकिस्तान आणि काँग्रेसमध्ये एक पाकिस्तान आहे अशी टीका केली होती. आता या सैफुद्दीन सोझ यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बहिष्कार घातल्याचे वृत्त समोर आले आहे.