पंजाबचे दिवंगत मुख्यमंत्री बियंत सिंग यांच्या हत्या प्रकरणात चंदीगडमधील जिल्हा न्यायालयाने जगतार सिंगला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ३१ ऑगस्ट १९९५ रोजी चंदीगडमध्ये सचिवालयाबाहेर बॉम्बस्फोट घडवून बियंत सिंग यांची हत्या करण्यात आली होती. या स्फोटात मुख्यमंत्र्यांसह १७ जणांचा मृत्यू झाला होता. जगतार सिंगला आपल्या कृत्याबद्दल कुठलीही पश्चातापाची भावना नाहीय.

मी केलेल्या कृत्याचा मला अजिबात खेद वाटत नाही असे त्याने जानेवारी महिन्यात कोर्टाला दिलेल्या पत्रात म्हटले होते. पंजाब पोलीस दलातील दिलावर सिंगने मानवी बॉम्ब बनून स्वत:ला स्फोटात उडवून घेतले होते. चंदीगड सत्र न्यायालयाने शुक्रवारी जगतार सिंगला दोषी ठरवले.

या प्रकरणात खटला १९९५ सालीच सुरु झाला होता. जगतार सिंग २००४ साली जगतार हावारा आणि परमजित सिंग या साथीदारांसह चंदीगड तुरुंगातून पळून गेला होता.