शेतकऱ्यांबाबत मला खूप चिंता वाटते आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष करु नये. त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि त्यांना संकटातून बाहेर काढावं या आशयाचं पत्र पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल यांनी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. त्यांच्या मागण्यांना महत्त्व देऊन योग्य तो तोडगा काढावा अशीही विनंती त्यांनी या पत्रात केली आहे.

पत्रात प्रकाश सिंह बादल म्हणतात, “तीन कृषी कायद्यांवर शेतकरी प्रश्न उपस्थित करत आहेत. देशातले शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. फक्त शेतकऱ्यांनाच नाही तर त्यांच्या कुटुंबीयांनाही कडाक्याच्या थंडीत आंदोलन करावं लागतं आहे. मला त्यांच्याविषयी खूप चिंता वाटते आहे. मुद्दा फक्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा नसून संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेबाबतचाही आहे”

पंजाब आणि हरयाणा येथील शेतकऱ्यांनी कृषी कायदे रद्द करण्यासाठी संप पुकारला आहे. गेल्या दहापेक्षा जास्त दिवसांपासून शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरु आहे. हे कायदे हे शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहेत. हे कायदे तातडीने रद्द करावेत अशी मागणी शेतकरी सातत्याने करत आहेत. दरम्यान सरकारची शेतकऱ्यांसोबत चर्चा सुरु आहे. असं असलं तरीही शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलेलं नाही. पंजाब आणि हरयाणा येथून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर येऊन आंदोलन करत आहेत. कडाक्याच्या थंडीत हे आंदोलन सुरु आहे. उद्या शेतकऱ्यांनी देशव्यापी संपाचीही हाक दिली आहे. या संपाला महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेसनेही हे कायदे रद्द करावेत अशी मागणी केली आहे. दरम्यान आत्तापर्यंत सरकार आणि शेतकरी यांच्यात झालेल्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. आता ९ तारखेला पुढची बैठक होणार आहे. यातून काय तोडगा निघणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान प्रकाश सिंह बादल यांनी शेतकऱ्यांविषयी चिंता व्यक्त करणारं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं आहे.