राज्यसभेचे माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार चंदन मित्रा यांचं दिल्लीत रात्री उशीरा निधन झालंय. मित्रा यांनी ६५व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा कुशन मित्रा यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिलीय. मित्रा द पायनियरचे संपादक आणि व्यवस्थापकीय संचालक होते.

मित्रा ऑगस्ट २००३ ते २००९ पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. जून २०१० मध्ये ते मध्य प्रदेशमधून भाजपाकडून राज्यसभेत निवडून आले. २०१६ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य राहिले. मित्रा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे निकटवर्तीय होते. मात्र, नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांच्या जोडीने त्यांना पक्षात महत्वाच्या जबाबदाऱ्यापासून दूर ठेवल्याचं म्हटलं जातं. जुलै २०१८ मध्ये मित्रा यांनी भाजपचा राजीनामा दिला आणि ते तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) सामील झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून मित्रा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. “चंदन मित्रा जी त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि अंतर्दृष्टीमुळे कायम स्मरणात राहतील. राजकारणासोबतच माध्यमांच्या जगातही त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या निधनामुळे मी दुःखी असून त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. ओम शांती,” असं पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटलंय.

याशिवाय भाजपचे नेते राम माधव, राज्यसभेचे खासदार स्वपन दासगुप्ता यांच्यासह अनेक नेत्यांनी मित्रा यांना श्रद्धांजली वाहिली.