राहुल द्रविडच्या नेतृत्त्वात उत्तम कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूने आत्महत्या केली आहे. द वॉल राहुल द्रविडच्या नेतृत्वात कामगिरी करणाऱ्या एम. सुरेश कुमारने आत्महत्या केली आहे. सुरेश कुमारने आत्महत्या का केली ते कारण अद्याप समजू शकलं नाही. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. सुरेश कुमारने १९९० मध्ये अंडर १९ च्या टीममधून केरळचं प्रतिनिधीत्व केलं होतं. केरळमधू अंड १९ च्या टीममध्ये खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला होता.
स्पिनर सुरेश कुमारने १९९० मध्ये न्यूझिलंडविरोधातल्या सामन्यातून पदार्पण केलं होतं. त्यावेळी राहुल द्रविड अंडर १९ च्या संघाचा कर्णधार होता. त्यावेळी राहुल द्रविड अंडर १९ संघाचा कर्णधार होता. त्यावेळी सुरेश कुमार आताचे आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्ज कोच आणि न्यूझीलंड संघाचे माजी कर्णधार स्टिफन फ्लेमिंग आणि जलदगती गोलंदाज डियोजन नॅशच्या विरोधात मैदानात उतरला होता. केरळने १९९३-९४ मध्ये रणजी करंडक जिंकला होता. तामिळनाडू विरुद्ध झालेल्या या सामन्यात सुरेश कुमारचा महत्त्वाचा वाटा होता.
सुरेश कुमारने आज सकाळी त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्याचा मृतदेह घरात आढळल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने या ठिकाणी धाव घेतली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सुरेश कुमारने २००५ मध्ये झारखंडविरोधातला रणजी सामना खेळल्यानंतर क्रिकेट संन्यास घेतला होता. त्यानंतर तो रेल्वेसोबत काम करु लागला होता. त्याने त्याच्या करिअरमध्ये ७२ प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने १९६ बळीही घेतले आहेत. त्याच्या कारकिर्दीत त्याने अनेक बड्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. cricketaddictor.com/ या वेबसाइटने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 10, 2020 1:31 pm