भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत जवळचे सहकारी असल्याचे मानले जाते. दोघांमधील सामंजस्याचे मोठे कौतुक केले जाते. भाजपाच्या यशामागे या जोडीगळीचा मोठा हात असल्याचे मानले जाते. परंतु, रिसर्च अँड अनॅलिसिस विंगचे (रॉ) माजी प्रमुख ए एस दुलत यांनी मात्र मोदी आणि शाह यांच्याबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. मोदी यांचा शाह यांच्यावर विश्वास नसल्याचा दावा त्यांनी पत्रकार बरखा दत्त यांना दिलेल्या मुलाखतीत केला आहे. ते म्हणाले, नरेंद्र मोदी आणि अजित डोवल (राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार) हे एकमेकांसाठीच बनले आहेत. अशावेळी त्यांच्याबरोबर काम करणे खूपच सोपे जाते. दोघांच्या व्यक्तिमत्वात खूपच साम्य आहे. मोदी कोणावरही विश्वास ठेवत नाहीत.. अमित शाह यांच्यावरही नाही. डोवल यांचेही असेच आहे. तेही कोणावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना आपल्या सावलीवरही विश्वास नाही. दुलत आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचे माजी प्रमुख मोहम्मद असद दुर्रानी यांनी एकत्रित येत एक पुस्तक लिहिले आहे. त्यानिमित्त ही मुलाखत घेण्यात आली होती.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये गेल्या काही वर्षांपासून कटुता आली आहे. द्विपक्षीय संबंधांत सुधारणा होण्यासाठी पंतप्रधान मोदींनी पूर्व सूचना न देता पाकिस्तानला पोहोचले होते. त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवल यांनीही पाकिस्तानातील आपले समकक्ष नासीर जंजुआ यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतरही पाकिस्तानकडून भारतविरोधी कारवाईसाठी दहशतवादी पाठवणे, सीमेवर शस्त्रसंधीच्या घटना वाढलेल्या आहेत.