उत्तर प्रदेशमधील नुकताच राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले समाजवादी पार्टीचे नेते व माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र नीरज शेखर यांनी मंगळवारी भाजपा सरचिटणीस भूपेंद्र यादव यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश केला. ते भाजपात प्रवेश करणार असल्याची सर्वांनाच खात्रा होती. सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या नीरज शेखर यांनी सोमवारीच राजीनामा दिला होता. भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनी भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांची देखील भेट घेतली.

भाजपा आता नीरज शेखर यांना त्यांच्याच मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीद्वारे राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यसभेत भाजपाची एक जागा वाढेल.लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपला पारंपारिक मतदार संघ असलेल्या बलियामधुन उमेदवारी मागितली होती. मात्र समाजवादी पार्टीने त्यांना उमेदवारी नाकरली होती. त्यामुळे ते पक्ष नेतृत्वावर नाराज होते.