‘एक श्रेणी- एक निवृत्तिवेतन’ या मागणीसाठी माजी सैनिकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांच्या मुलीने हजेरी लावल्यामुळे आंदोलनाला वेगळा आयाम लाभला. आंदोलनकर्त्यांची मागणी ‘न्याय्य’ असून आपल्या वडिलांनीही आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन तिने केले.सध्या लष्करात सेवारत असलेल्या एका अधिकाऱ्याची पत्नी असलेल्या मृणालिनी सिंग या माजी सैनिकांनी जंतरमंतरवर सुरू केलेल्या आंदोलनात रविवारी सहभागी झाल्या. ‘एक श्रेणी- एक निवृत्तिवेतन’ (ओरोप) धोरणाची लवकर अंमलबजावणी करावी, अशी मागणी करणारे पत्र आपल्या वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले असल्याचे त्यांनी सांगितले.सैनिकांची मागणी न्याय्य असून हा प्रश्न अनेक वर्षांपासून रेंगाळलेला आहे. ज्यांनी देशाची सेवा केली, परंतु ज्यांना गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या हक्कांसाठी लढावे लागत आहे अशा ज्येष्ठांना पाठिंबा देण्यासाठी मी येथे आली आहे, असे मृणालिनी यांनी सांगितले.तुमचे वडील परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री या नात्याने सरकारमध्ये असताना त्यांना तुमचे निषेधात सहभागी होणे पसंत आहे काय, असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, मी यासाठी त्यांची परवानगी मागितलेली नसून, त्यांच्या परवानगीची मला आवश्यकताही नाही. यापूर्वीच्या सरकारांनी या मागणीबाबत केवळ आश्वासने दिली असली, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे, असे त्या म्हणाल्या.