तृणमूलचे माजी नेते सुवेंदू अधिकारी यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा धक्का मानला जातो आहे. आज जेव्हा अमित शाह यांच्या उपस्थितीत सुवेंदू अधिकारी यांनी भाजपात प्रवेश केला तेव्हा त्यांनी ममता बॅनर्जींवर कडाडून टीका केली. ममता बॅनर्जी या कुणाच्याच नाहीत.  तृणमूल काँग्रेसमध्ये मला प्रचंड मानसिक छळाला सामोरं जावं लागलं. त्यावेळी ज्या नेत्यांनी मला त्रास दिला ते आता मला पाठीत खंजीर खुपसणारा माणूस अशी उपमा देत आहेत. ममता बॅनर्जी या कुणाच्याच नाहीत. मात्र एक गोष्ट खात्रीने सांगतो.. २०२१ मध्ये होणारी निवडणूक तृणमूल काँग्रेस जिंकणार नाही असं म्हणत सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली आहे.

पश्चिम बंगालची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे असंही सुवेंदू अधिकारी यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले, “आज सर्व पक्षांतील चांगले लोक भाजपात दाखल झाले आहेत. आज एक माजी खासदार आणि तृणमूल काँग्रेसमधील आमदार भाजपामध्ये आले आहेत. ही तर सुरूवात झाली आहे. निवडणूक येईपर्यंत ममता दीदी तुम्ही एकट्याच राहाल. सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीएमचे चांगले लोक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी पक्षात आले आहेत. ममता दीदी म्हणतात, भाजपा लोकांना करायला लावते. दीदींना मी आठवण करून देऊ इच्छितो की, जेव्हा तुम्ही काँग्रेस सोडून तृणमूल पक्ष बनवला, ते पक्षांतर नव्हते का?,” असा सवाल शाह यांनी ममता बॅनर्जी यांना केला.