पश्चिम बंगालमधील तृणमुल काँग्रेसचे विरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार मुकूल रॉय यांनी आज (शुक्रवारी) अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या महिन्यांत ते राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत तृणमुलमधून बाहेर पडले होते. दिल्ली येथील मुख्यालयात भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत रॉय यांचा भाजप प्रवेश झाला. यावेळी रॉय यांच्या राजकिय अनुभवाचा आम्हाला फायदा होईल असे रविशंकर प्रसाद म्हणाले.


पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी रॉय यांना ऑक्टोबर महिन्यांत तृणमूल काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. तत्पूर्वी, २५ सप्टेंबर रोजी त्यांनी तृणमूलमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले होते. भाजपसोबत त्यांची जवळीकता वाढत असल्याच्या कारणाहून त्यांच्यावर पक्षशिस्त भंग केल्याचा आरोप करण्यात आला होता.


एकेकाळी तृणमुल काँग्रेसच्या सु्प्रिमो ममता बॅनर्जी यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी मुकुल रॉय यांचे पक्षात स्थान होते. मात्र, आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तृणमुलसाठी हा मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, रॉय यांनी भाजपला धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचे म्हटले आहे. तसेच सुरुवातीच्या काळात भाजपशिवाय तृणमुललाही केंद्रातील यश चाखता आले नव्हते असे ते म्हणाले. मात्र, आता रॉय यांच्या भाजप प्रवेशामुळे पश्चिम बंगालमध्ये त्यांच्याकडून नवा पक्ष स्थापन करण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

येत्या काळात पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर रॉय यांनी भाजपत प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.