राहुल गांधी हे नेते आहेत असे मी अद्याप मानत नाही. कारण राहुल गांधी यांना जनतेने अद्याप नेता म्हणून स्वीकारलेले नाही. सध्या राहुल गांधी शिकत आहेत. जेव्हा जनता त्यांना स्वीकारेल तेव्हाच ते नेते होतील असे मी मानतो असे वक्तव्य माजी केंद्रीय कायदा मंत्री हंसराज भारतद्वाज यांनी केले आहे. काँग्रेसच्याच ज्येष्ठ नेत्याने राहुल गांधींना घरचा अहेर दिला आहे. एवढेच नाही तर काँग्रेस पक्षाकडून धर्माचे राजकारण होत असल्याने हा पक्ष अपयशी ठरतो आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राहुल गांधी यांनी कसून तयारी केली आहे. तसेच राफेल करार, नोटाबंदी, जीएसटी, बेरोजगारी या सगळ्या मुद्द्यावरून ते कायमच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत असतात. अशात आता काँग्रेसच्याच एका ज्येष्ठ नेत्याने राहुल गांधी जनता स्वीकारेपर्यंत नेते होऊ शकणार नाहीत असे म्हटले आहे.

राहुल गांधी यांना जेव्हा काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आले, तेव्हाही राहुल गांधींवर काही ज्येष्ठ नेत्यांनी टीका केली. मात्र गुजरात विधानसभा निवडणुकांच्या वेळी भाजपाला काटे की टक्कर देण्याची धमक आपल्यात आहे हे राहुल गांधींनी दाखवून दिले. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्यावर त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांकडून टीका होताना दिसते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून राहुल गांधी असे काँग्रेसकडून दाखवले जाते आहे. मात्र २०१९ ला काय होणार? मतपेटीत राहुल गांधींचा करीश्मा जादू दाखवू शकणार का? या गोष्टी महत्त्वाच्या ठरणारत आहेत