सार्वजनिक जीवनात दीर्घकाळ व्यतीत केलेले आणि चार पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात राहिलेले माजी केंद्रीय मंत्री बुटासिंग यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. ते आठ वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. बिहारचे राज्यपालपदही त्यांनी भूषविले होते.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले बुटासिंग यांना मेंदूतील रक्तस्रावामुळे गत ऑक्टोबरमध्ये अ. भा. आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते बेशुद्धावस्थेत (कोमा) होते. सकाळी ७.१०च्या सुमारास ते मरण पावल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. पार्थिवावर लोधी रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत व पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही बुटासिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
बुटासिंग यांचा जन्म १९३४ साली पंजाबमधील जालंधर येथे झाला. ते आठ वेळा लोकसभेचे खासदार होते. राजस्थानमधील जालोर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे सिंग सर्वप्रथम १९६२ साली लोकसभेवर निवडून गेले होते. पूर्वी ते शिरोमणी अकाली दलाशी संलग्न होते; मात्र १९६०च्या दशकात ते काँग्रेसमध्ये गेले.

काँग्रेसचा दलित चेहरा

काँग्रेसचे प्रमुख दलित नेते असलेले बुटासिंग हे १९७३-७४ साली अ. भा. काँग्रेस समितीच्या हरिजन सेलचे संयोजक होते व नंतर १९७८ साली ते पक्षाचे सरचिटणीस झाले. तीन वेळा राज्यमंत्री म्हणून काम पाहिल्यानंतर १९८३ साली ते सर्वप्रथम इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर राजीव गांधी व पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळातही ते होते.