जितीन प्रसाद यांच्या भाजपप्रवेशानंतर ‘जी-२३’मधील नेत्यांचे काँग्रेसनेतृत्वाला आवाहन

नवी दिल्ली : माजी केंद्रीयमंत्री जितीन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशावर काँग्रेसमधील कथित बंडखोर नेत्यांनी टीका केली असली तरी, पक्षांतर्गत बदलाचे आवाहनही पक्षनेतृत्वाला केले. ‘देशाच्या राजकारणात काँग्रेसला पूर्वीचे वैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर, पक्षात सुधारणा कराव्या लागतील, त्यासाठी आम्ही पक्षांतर्गत लढाई लढत आहोत. पण, पक्षनेतृत्वाने कोणाचे ऐकायचे नाही असे ठरवले तर पक्षाची अधोगती होईल. आमचे म्हणणे काँग्रेसने ऐकावे एवढीच आमची अपेक्षा आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिबल यांनी ‘जी-२३’ नेत्यांची भूमिका स्पष्ट केली.

काँग्रेस नेतृत्वाच्या म्हणजेच माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कार्यशैलीबद्दल नाराजी व्यक्त करणाऱ्या नेत्यांमध्ये सिबल यांच्याप्रमाणे जितीन प्रसाद यांचाही समावेश होता. या गटातील अन्य नेते वीरप्पा मोईली यांनी, पक्षाची मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल, निव्वळ वारशावर पक्ष चालवता येणार नाही, अशी टिप्पणी केली असून ठाम राजकीय वैचारिक भूमिका असलेल्या नेत्यांनाच पक्षात अधिकारपदावर बसवण्याची सूचनाही केली.

काही महिन्यांपूर्वी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी कथित बंडखोर नेत्यांची बैठक झाली होती. त्यानंतर पक्षाध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची घोषणा करण्यात आली होती, नवा पक्षाध्यक्ष निवडल्यानंतर केंद्रीय कार्यकारिणी समितीची निवडणूक होईल असेही स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, त्याबाबत अजून पक्षाच्या निवडणूक समितीने कार्यक्रम जाहीर केलेला नाही. पक्षांतर्गत बदल प्रलंबित असताना जितीन प्रसाद यांच्यासारखे तरुण नेते पक्ष सोडून जात असल्याने ज्येष्ठ नेत्यांनी पुन्हा उचल खाल्ली आहे.

‘सक्षम व्यक्तींना संघटना पदांवर बसवून पक्षाची पुनर्बांधणी करावी लागेल. संघटना बळकट करू शकत नाहीत अशा अकार्यक्षम व्यक्तींना अधिकार देऊन काहीच फायदा होणार नाही. जितीन प्रसाद यांच्यावरून धडा शिकावा व काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे’, असेही मोईली म्हणाले. पुढील वर्षी सात राज्यांत निवडणुका असून काँग्रेसला यश मिळाले नाही, तर लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणे अधिक कठीण होईल, असा इशाराही मोईली यांनी दिला.

भाजपप्रवेश करणाऱ्या जितीन प्रसाद यांची सिबल यांनी निर्भत्र्सना केली. पूर्वी पक्ष बदलणाऱ्यांना आयाराम गयाराम म्हणायचे, आता मी त्यांना ‘प्रसाद रामचे राजकारण’ म्हणतो. तीन दशके तुम्ही भाजपविरोधात लढला, आता त्यांची कास धरली? अशी टीका सिबल यांनी केली. जीव गेला तरी चालेल पण पक्षांतर करणार नाही, असेही सिबल म्हणाले. वैचारिक भूमिका स्पष्ट नसेल तर वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी पक्षबदल करणे सोपे असते, अशी टिप्पणी मोईली यांनी केली.