काँग्रेसला धक्का; उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे तरुण नेते जितीन प्रसाद यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करत काँग्रेसला धक्का दिला. उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षांतर केले.

गेल्या वर्षी ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसमून बाहेर पडत सत्ताधारी पक्षाचे कमळ हाती घेतले होते. दहा महिन्यांपूर्वी सचिन पायलट यांनीही बंडखोरीचा प्रयत्न केला होता. जितीन प्रसाद यांचा उत्तर प्रदेशमध्ये फारसा प्रभाव नसला तरी, त्यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसमधील तरुण नेत्यांचा असंतोष पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. पायलट यांची नाराजी अजूनही संपलेली नाही. पंजाबमध्ये मुख्यमंत्री अर्मंरदर सिंग यांच्या विरोधातही पक्षांतर्गत असंतोष वाढू लागला आहे.

एकेकाळी राहुल गांधी यांचे कट्टर समर्थक असलेले प्रसाद हे बंडखोर ‘जी-२३’ नेत्यांच्या गटात सहभागी झाले होते. पक्षनेतृत्वावर नाराज होत २०१९ मध्येही प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी चाचपणी केली होती. अखेर बुधवारी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस पक्ष का सोडावा लागला, या प्रश्नावर, बेदिली माजलेल्या पक्षामध्ये मी घेरलो गेलो होतो, तिथे लोकांसाठी काम करू शकत नाही असे मला वाटले, असे प्रसाद म्हणाले. आता भाजप हाच एकमेव राष्ट्रीय पक्ष उरलेला आहे. आता देशासमोर असलेल्या संकटाचे निवारण करण्याची ताकद फक्त पंतप्रधान मोदींमध्ये असल्याचे प्रसाद म्हणाले. भाजपच्या मुख्यालयात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी प्रसाद यांचे भाजपमध्ये स्वागत  केले. पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व घेतल्यानंतर जितीन प्रसाद यांनी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेतली.

उतर प्रदेशमध्ये आठ महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होत आहेत. योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनवल्यानंतर नाराज झालेल्या १३ टक्के ब्राह्मण मतदारांना जितीन प्रसाद यांच्या माध्यमातून पुन्हा आपलेसे करण्यात भाजपला यश मिळेल, असा कयास बांधला जात आहे. काही महिन्यांपूर्वी प्रसाद यांनी ब्राह्मण चेतना परिषद भरवून जातीच्या समीकरणांची जुळवाजुळव केली होती. वास्तविक, २०१९ मध्येही त्यांनी भाजपमध्ये जाण्याचे ठरवले होते, मात्र महासचिव प्रियंका गांधी-वढेरा यांच्या मध्यस्थीनंतर ते काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रिय झाले. २०१४ पासून प्रसाद यांना एकही निवडणूक जिंकता आलेली नाही. कॉंगे्रसने त्यांच्याकडे पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचाराची जबाबदारी दिली होती.