आज वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घडलेल्या हिंसेची इतिहासात नोंद घेतली जाईल. हा हिंसा सध्या राष्ट्राध्यक्ष पदावर असणाऱ्या व्यक्तीने भडवल्याने झाली असून ही व्यक्ती कायदेशीर मार्गाने पार पडलेल्या निवडणुकांबद्दल सातत्याने खोटे आरोप करत आहे. ही घटना आपल्या देशासाठी लज्जास्पद आणि अपमानजनक आहे, अशा शब्दांमध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी कॅपिटॉलमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनाचा निषेध केला. मात्र ही हिंसा अचानक घडलेली नसून ही चीड अनेक वर्षांपासून खदखदत होती आणि आता ती हिंसेच्या रुपात पाहायला मिळत असल्याचेही ओबामा म्हणाले आहेत.

आज कॅपिटॉलमध्ये जे घडलं ते अगदी अनपेक्षितपणे घडलं आहे असं आपण म्हणत असू तर आपण स्वत:चं हसं करुन घेण्यासारखा प्रकार ठरेल, अशा शब्दांमध्ये ओबामांनी अमेरिकन जनतेला मागील काही महिन्यांपासून सुरु असणाऱ्या राजकीय परिस्थितीचा हवाला देत आरसा दाखवला. आज राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्याने त्यांच्या समर्थकांनी धुडगूस घालत हिंसाचार केला. याच पार्श्वभूमीवर ओबामा यांनी फेसबुकवरुन या घटनेचा निषेध करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे.

मागील दोन महिन्यांपासून देशातील एक मोठा राजकीय पक्ष आणि त्याच्यासोबत असणारी प्रसारमाध्यम त्यांच्या पाठीराख्यांना सत्य दाखवण्यापासून दूर पळत आहेत. ही निवडणूक अटीतटीची झालेली नाही हे सत्य असून नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे २० जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहे. मात्र याला विरोध करणारे ज्या रंजक कहाण्या सांगत आहेत त्या गोल गोल फिरत असून सत्यापासून खूप दूर आहेत. मागील अनेक वर्षांपासून असलेली चीड या खोट्या दाव्यांच्या माध्यमातून समोर येत आहे. हीच चीड आणि त्याचे परिणाम आज आपल्याला हिंसेच्या रुपात दिसत असल्याचं ओबामा यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आणखी वाचा- अमेरिकेतील हिंसाचारात चार जणांचा मृत्यू; ५२ जणांना अटक

लोकशाहीच्या सदनामध्ये रिपब्लिकन नेत्यांनी कोणता पर्याय निवडला आहे हे आता दाखवून दिलं आहे. त्यांना याच मार्गाने जायचं असल्यास त्यांनी अशाच हिंसेला प्रोत्साहन देत रहावे किंवा त्यांनी सत्य स्वीकारुन या हिंसेची आग शांत करण्यासाठी पहिलं पाऊल उचलावं. ते अमेरिकेसोबत आहेत असं त्यांनी दाखवून द्यावं, असं आवाहनही ओबामा यांनी ट्रम्प समर्थक रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना केलं आहे.

आणखी वाचा- अमेरिकेत ट्रम्प समर्थकांकडून हिंसाचार; जो बायडन म्हणाले…’हा विरोध नव्हे देशद्रोह’

आज राष्ट्राध्यक्षांच्या पक्षातील अनेकांना बळजबरीने बोलायला भाग पाडण्यात आलं हे पाहून मला दु:ख झालं. त्यांच्या या बोलण्यामधून रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाखाली देशाची काय अवस्था झालीय हे दिसून येत आहे. तसेच जॉर्जियासारख्या राज्यांमधील स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्यास नकार देत प्रामाणिकपणे आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, यावरुनही देशाच्या परिस्थितीचा अंदाज येतो. आपल्याला या अशा प्रामाणिक नेत्यांची सध्याच्या काळात आणि भविष्यातही गरज आहे. आपला देशाचा खरा राजकीय हेतू काय आहे हे लक्षात घेऊन तो पूर्वव्रत करण्यासाठी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन काम करतील. आपण कोणत्या पक्षाचे आहोत याचा विचार न करता एक अमेरिकन म्हणून आपण जो यांना हे ध्येय साकार करण्यासाठी पाठिंबा दिला पाहिजे, असं भावनिक आवाहनही ओबामा यांनी केलं आहे.

आणखी वाचा- अध्यक्ष पदाची मुदत संपण्याआधीच ट्रम्प यांची गच्छंती?; हिंसाचार प्रकरणात ऐतिहासिक निर्णयाची शक्यता

बायडेन आणि मोदींनीही केलं ट्विट

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही ट्विटरवरुन या हिंसेचा निषेध केला आहे. कॅपिटॉल बिल्डिंगबाहेर जो गोंधळ झाला तो अमेरिकेचा खरा चेहरा नाही. कायदा न मानणाऱ्या अशा लोकांची संख्या खूप कमी आहे. हा देशद्रोहाचा मार्ग असून तो थांबलाच पाहिजे, असं बायडेन म्हणाले आहेत. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सत्ता हस्तांतरण हे शांततापूर्ण मार्गेने झालं पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे. “वॉशिंग्टन डी. सी. मधील दंगल आणि हिंसाचाराच्या बातम्या पाहून अस्वस्थ झालो. शांततेच्या मार्गाने योग्य पद्धतीने सत्ता हस्तांतरण झालं पाहिजे. कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या निषेधाच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रियेला डाग लागता कामा नये,” असं ट्विट मोदींनी केलं आहे.