प्रसिद्ध विचारवंत, साहित्यिक आणि कर्नाटकमधील माजी कुलगुरु एम एम कलबुर्गी यांची धरवाड येथे अज्ञात व्यक्तींनी आज गोळ्या झाडून हत्या केली.  महाराष्ट्रातील नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे आणि आता कर्नाटकमधील कलबुर्गी यांच्या हत्येमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
धारवाडमधील कल्याणनगर भागात कलबुर्गी यांचे निवासस्थान आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांचा दरवाजा ठोठावला. कलबुर्गी यांनी दरवाजा उघडताच त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. सदर घटनेनंतर त्यांना लगेच रुग्णालयात नेण्यात आले पण तिथेच त्यांचा मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून कलबुर्गी यांना हिंदू धर्मातील अंधश्रद्धेवर केलेल्या टिपण्णीमुळे धमक्या येत होत्या.
कलबुर्गी यांना केंद्र सरकारने साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविले होते. याबरोबरच त्यांना कर्नाटक सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार, नृपतुंगा पुरस्कार आणि पांपा पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते.