लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप असलेल्या एम.जे.अकबर यांचे सोमवारी दिल्ली कोर्टात एका माजी महिला सहकाऱ्याने समर्थन केले. प्रिया रमाणीच्या आरोपांमुळे एम.जे.अकबर यांचे न भरुन येणारे नुकसान झाले असून त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे असे या माजी महिला सहकाऱ्याने कोर्टापुढे सांगितले. अकबर यांनी दाखल केलेल्या मानहानी खटल्यात एक साक्षीदार म्हणून संडे गार्डीयनच्या संपादक जोईता बसू कोर्टात हजर झाल्या. त्यांनी अकबर यांचे समर्थन केले.

अकबर यांची प्रतिमा खराब करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रिया रमाणी यांनी टि्वट केले होते असे जोईता बसू यांनी कोर्टाला सांगितले. प्रिया रमाणीने १० आणि १३ ऑक्टोंबरला केलेले टि्वटस मी पाहिले. अकबर यांचे नुकसान करण्याचा हेतू त्यामागे होता असे जोईता बसू यांनी न्यायालयाला सांगितले. प्रिया रमाणी यांच्याप्रमाणेच अनेक महिला पत्रकारांनी #MeToo मोहिमेतंर्गत पुढे येऊन एम.जे.अकबर यांच्यावर गंभीर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांना १७ ऑक्टोंबरला केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

मी २० वर्ष अकबर यांच्यासोबत काम केले आहे. पण कर्मचाऱ्यांकडून त्यांच्याबद्दल कधीही वाईट ऐकले नाही. मला अकबर यांच्याबद्दल प्रचंड आदर असून ते पूर्णपणे व्यावसायिक आहेत. एम.जे.अकबर उत्तम शिक्षक असण्याबरोबरच सज्जन गृहस्थ  आहेत असे जोईता बसू यांनी न्यायालयाला सांगितले.

अकबर यांच्यावर बलात्काराचा आरोप
मागच्या आठवडयात सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या महिला पत्रकाराने एम. जे. अकबर यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. एशियन एज या वृत्तपत्रात कार्यरत असताना एम. जे. अकबर यांनी जयपूरमधील हॉटेलच्या खोलीत माझ्यावर बलात्कार केल्याचा दावा पल्लवी गोगोई यांनी केला आहे. पल्लवी गोगोई सध्या अमेरिकेतील ‘नॅशनल पब्लिक रेडियो’त बिझनेस विभागाच्या संपादक आहेत. त्यांनी वॉशिंग्टन पोस्टमधील लेख लिहिला असून यात त्यांनी एम. जे. अकबर यांनी केलेल्या अत्याचाराला वाचा फोडली आहे.