मृतांमध्ये भारतीय महिलेचा समावेश

गाझा पट्ट्यात इस्रायलने पॅलेस्टिनींवर केलेल्या हल्ल्यात मरण पावलेल्यांची संख्या आता ४३ झाली असून त्यात १३ मुले आणि ३ महिलांचा समावेश आहे. मूळ केरळच्या असलेल्या महिलेच्या घरावर अग्निबाण कोसळून त्यात तिचा मृत्यू झाला. सोमवारपासून सुरू झालेल्या या हल्ल्यांमध्ये तीनशे पॅलेस्टिनी जखमी झाले आहेत.

पॅलेस्टिनींनी इस्रायलवर शेकडो अग्निबाण सोडले. इस्रायलच्या आयर्न डोम एअर डिफेन्स सिस्टीम या प्रणालीने सुमारे शंभर अग्निबाण आकाशातच निकामी केले. आयर्न डोम ही इस्रायलची लघु पल्ल्याची क्षेपणास्त्रे हाणून पाडण्याची प्रणाली आहे. २०११ पासून ही यंत्रणा उपयोगात आहे.

२०१४ मध्ये पॅलेस्टाइन व इस्रायल यांच्यात अशाच प्रकारे संघर्ष झाला होता. गेल्या काही आठवड्यात पॅलेस्टिनी निदर्शक व पोलीस यांच्या अल अक्सा मशिदीच्या आवारात चकमकी झाल्या. हे ठिकाण ज्यू आणि मुस्लीम या दोघांसाठी पवित्र मानले जाते.

दरम्यान इस्रायलमध्ये चालू असलेल्या या संघर्षात सौम्या संतोष ही ३० वर्षांची मूळ केरळची असलेली महिला ठार झाली आहे. ती इडुक्की जिल्ह्यातील होती. पॅलेस्टिनी बंडखोरांनी गाझातून सोडलेल्या अग्निबाणांपैकी एक अ‍ॅशकेलॉन येथे तिच्या घरावर पडला. ही महिला तिचा पती संतोष याच्याशी दूरसंवादाने बोलत असतानाच तिचा मृत्यू झाला. ती सात वर्षे इस्रायलमध्ये राहत होती. अ‍ॅशकेलॉन हे ठिकाण गाझा पट्टीत सीमेवरच असून पॅलेस्टिनी बंडखोरांनी तेथे मोठ्या प्रमाणावर अग्निबाण सोडले होते.

ठार झालेल्या केरळच्या महिलेला नऊ वर्षांचा मुलगा आहे. तो केरळामध्ये तिच्या पतीकडे असतो. या महिलेबरोबर एक ८० वर्षांची महिला राहत होती, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.