ऑर्बिटरने घेतलेल्या प्रतिमांतून स्पष्ट; संपर्कासाठी ‘इस्रो’चे प्रयत्न

चांद्रयान-२ मोहिमेतील संपर्क तुटलेले ‘विक्रम लँडर’ चंद्राच्या पृष्ठभागावर आढळले असून त्याच्याशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) शास्त्रज्ञ करीत आहेत.

चंद्राच्या पृष्ठभागावर ‘विक्रम लँडर’ आढळले आहे, त्याचे अलगद अवतरण होण्याऐवजी आघाती अवतरण झाले असावे, असे ‘इस्रो’चे अध्यक्ष के. शिवन यांनी रविवारी येथे सांगितले. आघाती अवतरणामुळे ‘विक्रम’ची हानी झाली आहे का, असे विचारले असता त्याची माहिती नाही, लँडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे शिवन यांनी स्पष्ट केले. अलीकडच्या काळात इस्रायलच्या ‘बेरेशीत’ चांद्रयानाचे असेच आघाती अवतरण झाले होते.

शिवन यांनी वृत्तसंस्थांना सांगितले, की चंद्राच्या पृष्ठभागावर आम्हाला विक्रम लँडर आढळले आहे. त्याचा अर्थ त्याचे अलगद अवतरण होण्याऐवजी ते कोसळले असावे. या लँडरमध्ये ‘प्रज्ञान’ ही बग्गीसारखी गाडी आहे. ती अलगद अवतरणानंतर बाहेर येणे अपेक्षित होते. चांद्रयान २ मोहिमेतील ऑर्बिटरच्या कॅमेऱ्यांनी टिपलेल्या चांद्रभूमीच्या छायाचित्रांमध्ये ‘विक्रम लँडर’ दिसत आहे. ऑर्बिटरवर असलेल्या औष्णिक प्रतिमा चित्रण कॅमेऱ्याने त्याचे छायाचित्र टिपले आहे.

‘विक्रम लँडर’ शनिवारी पहाटे चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरुवातीला ‘विक्रम’चा प्रवास चंद्राच्या पृष्ठभागाकडे व्यवस्थित सुरू होता, पण लँडर चांद्रभूमीपासून २.१ कि.मी.वर असताना त्याचा ‘इस्रो’चे मुख्यालय आणि पृथ्वीवरील भूकेंद्रांशी असलेला संपर्क तुटला. त्यानंतर लँडरचे काय झाले हे समजू शकले नव्हते. अतिशय गुंतागुंतीच्या मोहिमेत वेग कमी करून लँडर चंद्रावर उतरवणे अवघड असते. त्यात आतापर्यंत अमेरिका, चीन, रशिया हे तीनच देश यशस्वी झाले आहेत. ‘विक्रम लँडर’ हे चार पायांवर उतरणे अपेक्षित होते, पण शेवटच्या क्षणी त्याचा संपर्क तुटला. आता  लॅंडरचे नेमके ठिकाण छायाचित्रातून समजले आहे.

‘इस्रो’ची अपयश विश्लेषण समिती नेमके काय चुकले याचा शोध घेत आहे. लँडरला गती देण्यासाठी असलेल्या यंत्रणेतून जास्त दाब निर्माण झाल्याने लँडर नियंत्रणाबाहेर गेले असावे किंवा पाच थ्रस्टरपैकी एकात बिघाडही झाला असण्याची शक्यता इस्रोच्या संशोधकांनी व्यक्त केली.

‘लँडर विक्रम’शी संपर्क तुटल्यानंतर इस्रोच्या नियंत्रण कक्षाने ‘नासा’च्या ‘डीप स्पेस नेटवर्क’चे माद्रिद येथील दुवे तपासले. त्यानंतर भारताच्या मॉरिशस येथील भूकेंद्राला मिळालेल्या माहितीचा अभ्यास केला. माद्रिद आणि मॉरिशस येथे ‘विक्रम’कडून कुठलेही संदेश आले नसल्याचे स्पष्ट झाले. विक्रम नियंत्रणाबाहेर जाण्याची कारणे शोधण्याइतकी माहिती आमच्याकडे आहे, असेही ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांनी सांगितले.

दरम्यान, लँडर विक्रमला वाहून नेणारे मुख्य अवकाश यान-ऑर्बिटर वर्षभर चंद्रावर घिरटय़ा घालणार आहे. या काळात त्यावर असलेली आठ उपकरणे १०० कि.मी.वरून चंद्राची माहिती जमा करतील आणि इस्रोकडे पाठवतील.

चांद्रयान २ मोहीम प्रेरणादायी – नासा

चांद्रयान २ मोहिमेतून आम्हाला प्रेरणा मिळाली आहे, असे ‘नासा’ या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने म्हटले आहे. यापुढे ‘इस्रो’सह सौरमालेचे संशोधन करण्यासाठी संयुक्त संशोधन मोहिमा राबवण्याची आमची तयारी असल्याचेही ‘नासा’ने स्पष्ट केले.

चांद्रयान २ मोहिमेत भारताने केलेल्या कामगिरीचे नासाने कौतुक केले.अवकाश मोहिमा कठीणच असतात. यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होते; पण त्यात अपयश आले असले तरी भारतीय संशोधकांनी गाठलेला टप्पा मार्गदर्शक आहे, असेही ‘नासा’ने म्हटले आहे.

चांद्रयान २ मोहिमेत इस्रोने केलेले प्रयत्न मोलाचे आहेत. त्यासाठी इस्रोचे आम्ही अभिनंदन करतो, असे ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी अलाइस जी वेल्स यांनी म्हटले आहे.

लँडर विक्रम’च्या प्रतिमा आम्हाला ऑर्बिटरकडून मिळाल्या आहेत. त्यांचे आणि माहितीचे विश्लेषण करण्यात येत आहे. शिवाय, ‘विक्रम’शी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

– के. शिवन, अध्यक्ष, इस्रो