News Flash

“आपली धोरणं आणि राजकारण वेगळं असू शकतं, मात्र…”; मोदींनी करुन दिली आठवण

संसदेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याच्या वेळी मोदी बोलत होते

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज दिल्लीमध्ये नवीन संसद भवानच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पंतप्रधानांनी दिलेल्या भाषणामध्ये नवीन संसद भवनाचे महत्व सांगितले. याच वेळी त्यांनी सध्याच्या परिस्थितीचा थेट संदर्भ न देता अत्यंत महत्वाचं भाष्यही केलं. आपल्या धोरणांमध्ये आणि राजकारणामध्ये फरक असू शकतो मात्र आपण सर्वजण इथे जनतेच्या सेवेसाठी आहोत हे विसरता कामा नये, असं मोदींनी सर्व लोकप्रतिनिधींना सांगितलं. भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी मोदींनी अगदी संसदेच्या इतिहासापासून ते भविष्यात या नवीन संसदेमुळे काय फायदा होणार आहे अशा अनेक गोष्टींबद्दल भाष्य केलं.

“आपल्या धोरणांमध्ये अंतर असून शकेल. आपल्या राजकारणही वेगवेगळ्या पद्धतीचं असू शकतं. मात्र आपण सर्वजण इथे जनतेच्या सेवेसाठी आहोत. हेच आपलं अंतिम ध्येय असायला हवं आणि यामध्ये कोणताही मतभेद असताना कामा नये. वाद-संवाद संसदेमध्ये असो किंवा संसदेच्या बाहेर असो आपण सर्वांनी राष्ट्रसेवेचे संकल्प घाती घेतला असून राष्ट्राच्या हितासाठी आपण करत असलेलं समर्पण आपल्या प्रत्येक कृतीमधून झळकलं पाहिजे,” असं मत मोदींनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. यामधून मोदींनी सर्व खासदारांनी अत्यंत जबाबदारीने वागणं आणि लोकसेवा हेच आपलं मूळ ध्येय आहे हे कायम लक्षात ठेवणं किती महत्वाचं आहे हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.

नक्की वाचा >> आताच्या संसद भवनाने मूलभूत गरजा पूर्ण केल्या नवी संसद भारताच्या महत्वाकांक्षा पूर्ण करणार : पंतप्रधान मोदी

सांगितले संसदेचं महत्व

यावेळी पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये नवीन संसद भवनाचे महत्व सांगितले. नवीन संसदेमध्ये अशा अनेक गोष्टी असतील ज्यामुळे खासदारांची दक्षता वाढले आणि काम करण्याच्या त्यांच्या शैलीमध्ये आधुनिकता येईल. सध्याच्या संसद भवनाने आपल्याला स्वातंत्र्यानंतर दिशा दाखवण्याचं काम केलं. तर नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीचं साक्षीदार ठरेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. जुन्या संसद भवनामध्ये देशासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गोष्टींसाठी काम करण्यात आलं तर नवीन संसदेमध्ये आता एकविसाव्या शतकातील भारताच्या महत्वकांशा पूर्ण करण्यासंदर्भातील काम होईल, असंही मोदींनी यावेळी म्हटलं.

संसदेच्या इतिहासावरही टाकला प्रकाश

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी बोलताना जगामध्ये १३ व्या शतकामध्ये मॅग्नाकार्टा यांच्याआधी १२ व्या शतकामध्ये भगवान बसवेश्वर यांनी लोक संसदेची सुरुवात केली होती असंही सांगितलं. दहाव्या शकतामध्ये तामिळनाडूमधील एका गावामध्ये पंचायत व्यवस्था अस्तित्वात होती असे संदर्भ सापडतात. या गावामध्ये आजही तशाच प्रकारची महासभा आयोजित केली जाते. एक हजार वर्षांपासून ही परंपरा तिथे सुरु आहे, असंही मोदींनी सांगितलं. त्यावेळी सुद्धा कोणत्याही प्रतिनिधीने आपल्या संपत्तीची माहिती देण्यास नकार दिला तर तिला आणि तिच्या नातेवाईकांना निवडणूक लढू दिली जात नव्हती, असंही पंतप्रधानांनी सांगितलं.

बांधिलकी जपा

आपल्या सर्वांना लोकप्रतिनिधी म्हणून हे लक्षात ठेवायला हवं की लोकशाही ही संसद भवनाचा मूळ आधार असून तिच्याबद्दलचा आशावाद आपण कायम ठेवला पाहिजे. हे आपल्या सर्वांच कर्तव्य आहे. संसदेमध्ये पोहचणारा प्रत्येक प्रतिनिधी हा जनतेला उत्तर देण्यास बांधील असतो हे कधीही विसरता कामा नये. ही बांधिलकी जनतेसोबतही आहेत मात्र तितकची संविधानाबद्दलही आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 3:41 pm

Web Title: foundation stone laying of the new parliament policies politics can differ but ultimate goal should be public service says pm modi scsg 91
Next Stories
1 आताच्या संसद भवनाने मूलभूत गरजा पूर्ण केल्या नवी संसद भारताच्या महत्वाकांक्षा पूर्ण करणार : पंतप्रधान मोदी
2 IPS अधिकाऱ्यानं भ्रष्टाचाराविरोधात दिलं भाषण; तासाभरातच लाचप्रकरणी झाली अटक!
3 “आत्मनिर्भर भारताला साक्ष ठरणार नवं संसद भवन”
Just Now!
X