स्वातंत्र्यदिनानंतर वरिष्ठ पत्रकार आणि आम आदमी पार्टीचे सदस्य आशुतोष राजकारणातून संन्यास घेण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला असून अद्याप तो पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मंजूर केलेला नाही. त्यामुळे, आशुतोष आता याची घोषणा सार्वजनिकरित्या करण्याची शक्यता आहे.

काही महिन्यांपूर्वीच आशुतोष यांनी राजीनामा दिल्याचे सुत्रांकडून कळते. आपल्या राजीनाम्यातील पक्ष सोडण्याचे काऱण खूपच खासगी असल्याचे आशुतोष यांनी म्हटले आहे. मात्र, आशुतोष यांचे जवळचे सहकारी आणि आपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, भ्रष्टाचाराविरोधात काम करताना जन्माला आलेल्या आपमध्ये ज्या उद्देशाने त्यांनी प्रवेश केला. त्या उद्देशापासून पक्ष भटकत चालला असल्याची त्यांची भावना आहे. त्यामुळे आपमधूनच नव्हे तर राजकारणातूनही संन्यास घेण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळे आशुतोष पुन्हा एकदा पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय होण्याची शक्यता आहे. अमर उजालाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वीच आशुतोष यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याचे पक्षातून जाणे हा आपसाठी मोठा झटका मानला जात आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमध्ये ते दिल्लीतील चांदणी चौक मतदारसंघातून तीन लाखांपेक्षा अधिक मते घेऊनही दिल्लीचे माजी मुख्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याविरोधात एक लाख मतांनी पराभूत झाले होते. मात्र, तरीही ते काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री कपील सिब्बल यांच्यापेक्षा सव्वा लाख मतांनी पुढे होते.

गेल्या वर्षी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीपासून आशुतोष यांचे पक्षनेतृत्वाबरोबर मतभेद निर्माण झाले. या निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल यांनी सुशील गुप्ता या उद्योगपतीला तिकीट दिले होते. त्याचबरोबर ते आशुतोष आणि संजय सिंह यांना राज्यसभेवर पाठवणार होते. मात्र, आशुतोष यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, सुशील गुप्तांबरोबर राज्यसभेत जण्यास आपण इच्छूक नाही. आपल्याला तिकीट मिळो किंवा न मिळो गुप्ता राज्यसभेवर जायला नको, अशी भुमिका होती. त्यानंतर केजरीवाल यांनी त्यांच्या जागी चार्टर्ड अकाऊंटंट एन. डी. गुप्ता यांना संधी दिली होती.

किरण बेदी, प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, मयांक गांधी, शाजिया इल्मी आणि कुमार विश्वास यांच्यासह आशुतोष आपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. कुमार विश्वास यांच्याव्यतिरिक्त सर्वांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. कुमार विश्वास पक्षात असले तरी ते नसल्यासारखेच आहेत. कारण, ते पक्ष कार्यात निष्क्रिय आहेत.