माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांचं आज निधन झालं. त्यांच्या जाण्यानं झालेली हानी ही कधीही भरून न निघण्यासारखी आहे. अरुण जेटली यांची उणीव कायम भासेल त्यांच्या निधनामुळे अतीव दुःख झाल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. भाजपासाठी हा वर्षभराचा काळ अत्यंत वेदनादायी ठरला. सुषमा स्वराज, मनोहर पर्रिकर, अनंत कुमार आणि आता अरूण जेटली अशा भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी यावर्षी जगाचा निरोप घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनंत कुमार
केंद्रीय रासायनिक आणि संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांचं 12 नोव्हेंबर 2018 रोजी कर्करोगाच्या आजारानं निधन झालं. ते 59 वर्षांचे होते. बेंगळूरू येथील आपल्या निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. 1996 पासून दक्षिण बंगळुरू मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले होते. 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात सामिल झालेले ते युवा मंत्री होते. त्यांच्या खांद्यावर नागरी उड्डयन मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. तसंच संयुक्त राष्ट्र संघात कन्नडमध्ये बोलणारे ते पहिले व्यक्ती होते.

मनोहर पर्रिकर
17 मार्च 2019 रोजी गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे दीर्घ आजाराने वयाच्या 63 व्या वर्षी निधन झालं. अत्यंत साधे राहणीमान आणि तल्लख बुद्धी असलेले पर्रीकरांनी अखेरच्या श्वासापर्यंत काम करत होते. पर्रिकर हे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. ऑक्टोबर 2000 मध्ये ते पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. दरम्यान, जून ते नोव्हेंबर 1999 या काळात विरोधी पक्ष नेते होते. त्यानंतर 2014 मध्ये केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर 2014-17 या काळात त्यांच्यावर संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांच्या या कार्यकाळातच सर्जिकल स्ट्राइकचा निर्णय घेण्यात आला होता. मार्च 2017 मध्ये गोवा विधानसभा निवडणुकीनंतर केंद्रातील मंत्रीपदाचा राजीनामा देत ते पुन्हा गोव्यात परतले आणि पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री बनले. अत्यंत साध राहणीमान हे त्यांच्या स्वभावातील महत्त्वाचे वैशिष्ट्य होते.

सुषमा स्वराज
भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे 7 ऑगस्ट रोजी वयाच्या 66 व्या वर्षी कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झालं. भाजपच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून त्यांची जनमानसात ओळख होती. त्यांच्या कार्यामुळे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने भारतीय राजकारणातली ‘सुपरमॉम’ असा त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता. समाजमाध्यमावर अत्यंत सक्रीय आणि मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या स्वराज यांनी परदेशात मदतीसाठी अडकलेल्या अनेक नागरिकांना केवळ एका ट्विटवरुन मदत केली होती. त्यामुळे नागरिकांमध्येही त्या अत्यंत लोकप्रिय होत्या. आपल्या भाषणांच्या जोरावर सुषमा स्वराज यांनी आपल्या कार्यकाळात संसदेमध्ये सर्वांची मनं जिंकून घेतली. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बाजू सुषमा स्वराज यांनी अतिशय कणखरपणे मांडली.

अरूण जेटली
प्रदीर्घ आजारानं माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांचं 24 ऑगस्ट रोजी वयाच्या 66 व्या वर्षी निधन झालं. श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मोदी सरकाच्या पहिल्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर निरनिराळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. त्या त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केल्या. भाजपाची रणनिती आखण्यातही जेटली यांची महत्त्वाची भूमिका होती. संसदेत अरुण जेटली जरी आक्रमक भासत असले तरी सर्वपक्षात त्यांचे मित्र होते. पेशाने वकिल असणारे अरुण जेटली उत्तम वक्ते होते. त्यांनी अनेकवेळा आपल्या जोरदार भाषणांनी विरोधकांना निरुत्तर केले. भाजपा दुसऱ्यांदा केंद्रात पूर्ण बहुमताने सत्तेत आल्यानंतर अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून आरोग्याच्या कारणामुळे आपल्याला नव्या सरकारमध्ये कुठली जबाबदारी स्वीकारता येणार नाही असे कळवले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four bjp leaders passed away within year anant kumar manohar parrikar sushma swaraj arun jaitley jud
First published on: 24-08-2019 at 15:09 IST