जम्मू काश्मीर पोलिसांना दहशतवादाचं कंबरडं मोडण्यात मोठं यश मिळालं असून गेल्या चार महिन्यात चार दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांना ठार केलं आहे. पोलिसांनी लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबूल मुजाहिद्दीन आणि अंसार गजवत उल हिंद या दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांचा खात्मा केला आहे. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी ही माहिती दिली आहे.

“मी सुरक्षा दलांचं अभिनंदन करतो. इतिहासात पहिल्यांदाच लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबूल मुजाहिद्दीन आणि अंसार गजवत उल हिंद या दहशतवादी संघटनांचे प्रमुख चार महिन्यात ठार झाले आहेत. यामुळे दहशतवादी संघटनांना मोठा धक्का बसला आहे,” अशी माहिती विजय कुमार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली आहे.

“गेल्या दोन दिवसांत दोन यशस्वी मोहीम राबवण्यात आल्या. कुलगाम येथे करण्यात आलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले असून दोन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. एक दहशतवादी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील असून जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते कुलगाममध्ये सक्रीय होता. तो शूटर आणी आईडी तज्ञ आहे. त्याच्याकडून एके-४७, पिस्तूल आणि काही स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

दरम्यान पाकिस्तानी ड्रोन पाडून जप्त करण्या आलेली शस्त्र पुलवामा येथील दहशतवाद्यांसाठी नेली जात होती असं त्यांनी सांगितलं आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी कठुआ येथे हे ड्रोन पाडलं. “कुलगाम येथील पाकिस्तानी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याकडून एके-४७ आणि एम ४ कार्बाइन आणि पिस्तूल जप्त करण्यात आलं आहे. जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी एम ४ रायफल्स वापरतात हे स्पष्ट झालं आहे. पाकिस्तानच्या ड्रोनमधून एम-४ रायफल जप्त झाली आहे,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

“कठुआ येथे संभाषणादरम्यान अली भाई नावाचा उल्लेख झाल्याचं लक्षात आलं. आम्ही तपास केला असता पाकिस्तानी दहशतवादी फुकरान पुलवामा येथे सक्रीय असल्याचं निष्पन्न झालं. फुकरान यानेच ही रायफल पाकिस्तानी ड्रोनच्या सहाय्याने आणल्याचा संशय आहे,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.