अमेरिकेत अभूतपूर्व सत्तासंघर्ष सुरु असून डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत म्हणजेच कॅपिटॉल इमारतीबाहेर जोरदार गोंधळ घातला असून हिंसाचार केला आहे. ट्रम्प समर्थक हजारोंच्या संख्येने इमारतीबाहेर जमा झाले होते. जो बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अमेरिकन काँग्रेसची बैठक सुरु असतानाच ट्रम्प समर्थकांनी गोंधळ घालत हिंसाचार करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान यावेळी पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. रॉयटर्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

अमेरिकेत अभुतपूर्व सत्तासंघर्ष, ट्रम्प समर्थकांकडून हिंसाचार; संसदेत घुसून तोडफोड
फेसबुक आणि ट्विटरकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठी कारवाई

पोलिसांनी गोळीबार केला असता एका महिला आंदोलकाचा मृत्यू झाला होता. यानंतर आता ही संख्या चारपर्यंत पोहोचली आहे. दरम्यान हिंसाचार करणाऱ्या ५२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कर्फ्यू असतानाही नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तसंच कॅपिटॉलमधील हिंसाचार प्रकरणी ही कारवाई कऱण्यात आली.

पोलीस आणि आंदोलकांमध्ये जवळपास चार तास संघर्ष सुरु होता. चार तासांनी पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आलं. मृत्यू झालेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात महिलेच्या खांद्याला गोळी लागली होती. मृतांमध्ये अजून एक महिला आणि दोन पुरुष आंदोलक आहेत. मेट्रोपोलिअन पोलीस विभागाचे प्रमुख रॉबर्ट यांनी आंदोलकांनी केलेला हिंसाचार लाजीरवाणा प्रकार असल्याचं म्हटलं आहे.