रस्त्यावर फिरणारी भटकी कुत्री अनेकदा अपघातांना कारणीभूत ठरतात. या कुत्र्यांना वाचवण्याच्या नादात मोठे अपघात घडतात. आतापर्यंत भटक्या कुत्र्यांमुळे दुचाकीस्वारांचे जास्त अपघात झाले आहेत. अशा अपघातांमध्ये अनेकांनी नाहक आपले प्राण गमावले आहेत. बंगळुरुच्या तावरेकेरेजवळ रविवारी एका एसयूव्ही कारचा असाच भीषण अपघात घडला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

नेमकं काय घडलं?
आग्राहारा येथे राहणारे सुनील कुमार (३५), संतोष (२८), राघवेंद्र (३४) आणि मंजुनाथ (३६) हे चार मित्र फोर्ड इकोस्पोर्ट एसयूव्ही कारने तुमाकुरु जिल्ह्यातील कुनीगल तालुक्यात देव दर्शनासाठी चालले होते. सुनील कुमार एका खाद्य कंपनीत, संतोष खासगी कंपनीत तर राघवेंद्र, मंजुनाथ ज्वेलरीच्या दुकानात कामाला होते. सुनील कुमार गाडी चालवत होता तर मंजुनाथच्या मालकीची गाडी होती.

त्यांना ह्युलीयुरदुर्ग येथे पोहोचायचे होते. त्यांची एसयूव्ही कार मागादी रोडवर असताना संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास रस्त्यात आडव्या आलेल्या एका भटक्या कुत्र्याला वाचवताना चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले व गाडी बायचागुप्पी नदीत जाऊन पडली. बंगळुरुच्या तावरेकेरेजवळ हा अपघात घडला.

कारच्या खिडक्या बंद होत्या?
अपघाताच्यावेळी खिडक्या बंद असल्यामुळे चौघांनाही कार बाहेर पडता आले नाही. काही मिनिटांमध्ये ही कार नदीमध्ये बुडाली. नदीमध्ये फक्त सहा फूट पाणी होते. कारने थेट पाण्याचा तळ गाठला अशी माहिती पोलिसांनी दिली.
रस्त्यावरुन जाणाऱ्या वाटसरुंनी पोलीस आणि अग्निशमन विभागाला या अपघाताची माहिती दिली. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असून सोमवारी मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येईल.