युद्धनीतीत ‘अतिआक्रमक’ अशी ख्याती असलेल्या इस्रायल सैन्याची तटबंदी भेदत दोन पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी मंगळवारी येथील सिनेगॉघमध्ये (ज्यू प्रार्थनास्थळ) केलेल्या भीषण हल्ल्यात चार भाविक ठार झाले. कुऱ्हाडी, चाकू आणि बंदुका घेऊन आत घुसलेल्या दहशतवाद्यांनी काही क्षणात सिनेगॉघमध्ये धुमाकूळ घातला. या हल्ल्यात इतर आठ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान इस्राइल येथे पर्यटनासाठी गेलेले ४० भारतीय सुरक्षित असल्याचे समजते. या घटनेनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या हल्ल्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला.  
हार नोफनजीकच्या सिनेगॉघमध्ये कुऱ्हाडी, चाकू आणि बंदुकांसह घुसलेल्या दोन दहशतवाद्यांनी काही क्षणांत प्रार्थनास्थळी जमलेल्या चार भाविकांवर हल्ला चढवला आणि त्यांना ठार केले, तर अन्य आठ जणांना जखमी केले. यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत हे दोन दहशतवादी ठार झाले. हाराव शिमॉन अ‍ॅगासी मार्गावर हे सिनेगॉघ आहे, याशिवाय इतर धार्मिक स्थळेही आहेत.
दहशतवाद्यांनी येथील भाविकांची गर्दी हेरूनच एकापेक्षा अनेक स्थळांवर हल्ला केला. हल्ल्यांत दोन पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत. या दुर्घटनेपासून अवघ्या काही अंतरावर असलेले महाराष्ट्रातील ४० पुणेकर पर्यटक मात्र सुखरूप असल्याचे समजते.