कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असतानाच धर्मनिरपेक्ष जनता दलास शनिवारी जोरदार झटका बसला. राज्यसभेच्या निवडणुकीत जनता दलाची चार मते फुटली आणि त्याचा लाभ काँग्रेसच्या उमेदवारांना झाला. जनता दलाच्या ज्या चार बंडखोर आमदारांची मते फुटली त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

सदर आमदारांची नावे झमीर अहमद खान, आर. ए. श्रीनिवासमूर्ती, एन. चालुवराया स्वामी आणि भीमा नाईक अशी असून त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष के. बी. कोलीवाड यांच्याकडे त्यांच्या निवासस्थानी राजीनामे सुपूर्द केले. हे बंडखोर आमदार येत्या एक-दोन दिवसांत काँग्रेसमध्ये सहभागी होणार आहेत.

धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांच्याविरुद्ध सात आमदारांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे, त्यापैकी हे चार आमदार आहेत. सदर चार आमदारांचे राजीनामे कोलीवाड यांनी मंजूर केले आहेत. एच. डी. कुमारस्वामी हे कोणालाही जुमानत नाहीत, माजी पंतप्रधान आणि त्यांचे वडील एच. डी. देवेगौडा यांच्याशीही ते सल्लामसलत करीत नाहीत तर ते आमचे म्हणणे ऐकून घेतील का, असा सवाल  या आमदारांनी केला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत जद(एस)च्या सात बंडखोर आमदारांची मते फुटल्याने त्याचप्रमाणे अपक्षांनी पाठिंबा दिल्याने  सत्तारूढ काँग्रेसने तिसरी जागा जिंकली.