गेल्या आठवडय़ात कराचीमध्ये अल्पसंख्याक शिया इस्माइली समुदायाच्या ४५ लोकांना ठार करणाऱ्या बसहल्ल्याच्या संदर्भात अटक करण्यात आलेले चार दहशतवादी अल-कायदाच्या ‘स्लीपर सेल’शी संबंधित होते, अशी माहिती एका तपासकर्त्यांने दिली आहे.
हे सर्व जण प्रतिष्ठित अशा शैक्षणिक संस्थांमध्ये शिकलेले असून, त्यांच्यापैकी हल्ल्याचा सूत्रधार असलेला ताहिर हुसैन मिन्हास हा पूर्वी ओसामा बिन लादेन आणि ऐमान-अल-झवाहिरी यांना भेटला होता, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. हे चार दहशतवादी अल-कायदाच्या स्लीप सेलशी संबंधित असल्याचे तो म्हणाला.
पोलिसांच्या गणवेषात एका बसवर हल्ला करून ४५ जणांना ठार मारण्याच्या १३ मे रोजीच्या घटनेत आपण सहभागी होतो, अशी कबुली या दहशतवाद्यांनी दिली असल्याचे सिंधचे मुख्यमंत्री सैयद कायम अली शाह आणि अंतर्गत मंत्री चौधरी निसार खान यांनी सांगितले. इसिस या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. पाकिस्तानमधील प्रमुख मानवाधिकार कार्यकर्त्यां सबीन महमूद यांच्या २४ एप्रिल रोजी झालेल्या हत्येमागेही या चौघांचा हात होता.