चार महिन्यांच्या मोहम्मदला त्याची आई रोज शाहीन बाग येथील आंदोलनस्थळी घेऊन जात होती. तिथं आंदोलक त्याला आपल्या कुशीत घेऊन त्याला खाऊ-पिऊ घालत होते. इथं त्याच्या गळ्यात तिरंगी पंचा घातलेला असायचा. मात्र, आता चार महिन्यांचा हा चिमुकला पुन्हा शाहीन बाग येथे दिसणार नाही. कारण, गेल्या आठवड्यात कडाक्याच्या थंडीनं त्याचा मृत्यू झाला आहे. मात्र, आपलं मुलं गमावूनही त्यांच्या आई-वडिलांचा निग्रह कमी झालेला नाही. त्याची आई अद्यापही शाहीन बाग येथील आंदोलनस्थळी ठाण मांडून आहे.

शाहीन बाग येथे खुल्या जागेत आंदोलनादरम्यान चार महिन्यांच्या या मुलाला थंडीचा त्रास झाला. त्याला प्रचंड सर्दी आणि छातीमध्ये कफ झाला होता. त्यामुळे त्याला श्वसनाला त्रास होऊ लागल्याने मृत्यू झाला. मात्र, त्याची आई अद्यापही आंदोलनात सहभागी होण्यावर ठाम आहे. त्यांचं म्हणणं आहे की, हे आंदोलन माझ्या मुलांच्या भविष्यासाठी आहे.

मृत्यू पावलेल्या मोहम्मद जहाँ याचे आई-वडिल नाजिया आणि आरिफ हे दिल्लीतल बाटला हाऊस परिसरात प्लास्टिक आणि जुन्या कपड्यांच्या सहाय्याने बनवलेल्या छोट्याशा झोपडीत राहतात. त्यांना आणखी दोन मुलं आहेत यांमध्ये पाच वर्षांची मुलगी आणि एक वर्षांचा मुलगा आहे. मुळच्या उत्तर प्रदेशातील बरेलीचं असलेलं हे कुटुंब मोठ्या कष्टानं आपला दररोजचा खर्च भागवतात. आरिफ ई-रिक्षा चालवण्याचे काम करतात तर त्यांची पत्नी नाजिया त्यांना इतर एका कामात मदत करते.

“सीएए आणि एनआरसीमुळचं आमच्या बाळानं जीव गमावला”

नाजिया म्हणाल्या, “सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) देशामध्ये धर्माच्या नावाने फूट पाडत आहे. त्यामुळे या कायद्याला कधीही स्विकारलं जाऊ शकत नाही. यामध्ये राजकारण आहे की नाही याची मला माहिती नाही. मात्र, मला इतकं पक्क माहिती आहे की हे आमच्या मुलांच्या भविष्याच्या विरोधात आहे. त्यामुळे यावर मी प्रश्न उपस्थित करणारच.” दरम्यान, आरिफ यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूला ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’ला जबाबदार धरले आहे. त्यांनी म्हटले की, “जर सरकारने सीएए आणि एनआरसी आणलंच नसतं तर लोकांनी आंदोलन केलं नसतं आणि माझी पत्नी या आंदोलनात सहभागी झाली नसती त्यामुळे माझ्या मुलाचा मृत्यूही झाला नसता.”