छत्तीसगडमधील बिजापुर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घातपात घडवण्यासाठी पेरून ठेवलेली चार स्फोटकं हस्तगत करण्यात जवनांना यश आले आहे. यामुळे नक्षलवाद्यांचा मोठा घातपाताचा प्रयत्न फसला असल्याचे समोर आले आहे. सोमवारी दोन ठिकाणांहून ही स्फोटक हस्तगत करण्यात आली. मात्र, एका ठिकाणच्या स्फोटकास निकामी करत असताना स्फोट झाल्याने एक जवान जखमी झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

या पाच स्फोटकांपैकी चार सारकेगुडा आणि तार्रेम या गावांमधील रस्त्यातून सीआरपीएफच्या जवानांनी हस्तगत केली. तर, अन्य एक जिल्हा पोलीस दलास सागमेटा गावाजवळ हस्तगत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. माओवाद्याच्या बॅनरमागे पेरून ठेवलेल्या या स्फोटकास निकामी करण्याचा जवानांकडून प्रयत्न सुरू असतानाच, अचानक स्फोट झाला व यात एक जवान जखमी झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. मदकम सोमदू असे नाव असलेल्या या जखमी जवानास तातडीने स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक नसल्याचे सांगण्यात आले आहे. सारकेगुडा आणि तार्रेम या ठिकाणी सापडलेले चार स्फोटकं सीआरपीएफच्या बॉम्ब नाशक पथकाने निकामी केले असल्याचे सांगण्यात आले आहे.

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या बस्तर परिसरात सध्या नक्षलविरोधी अभियान जोरदार सुरू आहे. १५ सप्टेंबर रोजी सुकमा जिल्ह्यात जवानांनी चकमकीत तीन नक्षलींचा खात्मा केला होता. त्याच्या एक दिवस अगोदरच बस्तर परिसरात तीन नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले होते.