बाकसा जिल्ह्य़ातून एका स्वयंघोषित कमांडरसह एनडीएफबीच्या (एस) चार दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून शस्त्रे आणि आरडीएक्स स्फोटके हस्तगत केली आहेत.
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या यादीत नाव असलेल्या दोघा घुसखोरांसह चार जणांना सोमवारी मध्यरात्री अटक करण्यात आली. सदर दहशतवादी मेघालयातून आसाममध्ये येत होते.
लंकेश्वर बोडो ऊर्फ लाची, संतोष खेरकोटरी ऊर्फ चिमांग, रविराम वासुमोतरी आणि गंबर गायरी अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. लाची आणि चिमांग यांचा २०१४ मधील नारायण गुरी हत्याकांडात सहभाग होता. नरसिंगबारी येथील काही खूनप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा त्यांचा शोध घेत होते.
या दहशतवाद्यांनी सालबारीच्या दुर्गम भागांत दडवून ठेवलेली शस्त्रे
आणि स्फोटके यांचा मोठा साठाही पोलिसांनी हस्तगत केला आहे. एके-४६ रायफल, मॅगझीन, ८२ काडतुसे, दोन बॉम्ब, एक पिस्तूल, दोन डिटोनेटर्स आणि १० किलो आरडीएक्स स्फोटके हस्तगत करण्यात आली आहेत.