नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या चार नवनियुक्त न्यायाधीशांना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी शुक्रवारी शपथ दिली. आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या मंजूर क्षमतेइतकी म्हणजे ३१ झाली आहे.
न्या. बी. आर. गवई, न्या. सूर्यकांत, न्या. अनिरुद्ध बोस, न्या. ए. एस. बोपन्ना यांना न्यायालय क्रमांक १ च्या कक्षात सरन्यायाधीश गोगोई यांनी विद्यमान न्यायाधीशांच्या उपस्थितीत शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयातील ३१ न्यायाधीशात तीन महिला असून त्यात न्या. आर. बानुमती, न्या. इंदू मल्होत्रा, न्या. इंदिरा बॅनर्जी यांचा समावेश आहे. २००८ मध्ये सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या २६ वरून ३१ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर प्रथमच न्यायालयात पूर्ण क्षमतेने न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी चार न्यायाधीशांच्या नेमणुकीस मान्यता दिली. न्या. बोस व न्या. बोपन्ना यांची नावे याआधी केंद्राने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाकडे परत पाठवली होती. प्रादेशिकता, सेवाज्येष्ठता हे मुद्दे त्यात होते. ८ मे रोजी न्यायवृंदाने ती पुन्हा पाठवली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 25, 2019 12:12 am