इस्माइली मुस्लिमांवर बसमध्ये केलेला हल्ला आणि इतर दहशतवादी हल्ल्यांच्या प्रकरणात एका उच्च विद्याविभूषितासह चार पाकिस्तानी व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

यातील एकाचे शिक्षण अमेरिकी विद्यापीठात झाले असून तो महाविद्यालयाचा संचालक आहे. या चार जणात अदिल मासूद बट, खालीद युसूफ बारी, सलीम अहमद व महंमद सुलेमान सईद यांचा समावेश असून त्यांनी कराची येथे १३ मे रोजी बसमध्ये ४५ शिया मुस्लिमांची हत्या करण्याच्या कटात आर्थिक मदत केली होती व हल्लेखोरांना क्रूर कृत्यांची शिकवण दिली होती, असे दहशतवाद विरोधी विभागाचे पोलिस प्रमुख राजा उमर खत्तब यांनी सांगितले.

बट याचे शिक्षण कराचीत झाले असून तो बीबीए करण्यासाठी १९८७ मध्ये अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठात गेला होता व नंतर त्याने न्यूयॉर्क येथील फॉरढॅम विद्यापीठातून १९९२ मध्ये एमबीए केले होते. तो कराचीत कॉलेज ऑफ अकाउंटन्सी अँड मॅनेजमेंट सायन्सेस ही संस्था चालवतो. तेथे दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. दुसरा संशयित बारी हा इलेक्ट्रॉनिक अभियंता असून तो पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्समध्ये काम करीत होता. विशेष पथकाने बारी याला बस बॉम्बस्फोट प्रकरणी अटक केली. बारी हा अल कायदाशी संबंधित असून त्याचे तनझीम ए इस्लामीशी संबंघ आहेत. अल कायदाचा कराचीतील प्रमुख उमर उर्फ जलाल चंडियो याच्याशी त्याचे संबंध असून बस हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल्ला युसूफ याच्याशी त्याचा परिचय होता. सलीम हा दहशतवादी गटासाठी १९९२-९३ मध्ये देणग्या गोळा करीत होता तर सुलेमान हा अब्दुल्लाचा मेव्हणा आहे. तो मशिदीबाहेर उभा राहून देणग्या गोळा करीत असे.

या दोघांच्या पत्नींनी महिलांना दहशतवादी हल्ल्यांची शिकवण दिली होती व बारी याच्या पत्नीने अल झिकरा अकादमी सुरू केली, त्यात २० सुशिक्षित महिलांना दहशतवादाचे शिक्षण दिले जात होते. सिंध, कराची येथील काही विद्यापीठांवर पोलिसांचे लक्ष आहे. बारी याला अटक करून कोठडी देण्यात आली आहे. १३ मे रोजी एके ४७ रायफली घेतलेल्या सहा अतिरेक्यांनी बसवर हल्ला करून ४५ शिया इस्मायली मुस्लिमांची डोक्यात गोळ्या घालून हत्या केली होती.