राजस्थानमध्ये कथित गोरक्षकांकडून एका तरुणाची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशात मृत म्हशीची वाहतूक करणाऱ्या चौघांना जमावाने मारहाण केल्याचं समोर आलं आहे. चौघांवर म्हैस चोरी केल्याचा आरोप करत मारहाण करण्यात आली. जमावाने कायदा हातात घेत जवळपास अर्धा तास चौघांना मारहाण केली. अखेर पोलिसांनी जमावाला नियंत्रणात आणत चौघांची सुटका केली.

गावकऱ्यांनी सांगितल्यानुसार, मृत म्हशीला पिक-अप व्हॅनमधून घेऊन जात असताना चौघांना पकडण्यात आलं. त्यांनी विष देऊन म्हशीला ठार केलं होतं.

चौघांना मारहाण होत असताना एका गावकऱ्याने व्हिडीओ शूट केला होता, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओत चौघेही जमिनीवर बसले असून त्यांना गावकऱ्यांनी घेरलं असल्याचं दिसत आहे.

यावेळी मारहाण करण्यात आलेला एक व्यक्ती आपण चोर नसून, आपल्या मालकाने दिलेल्या सुचनेनुसार मृत म्हशीला घेऊन जाण्यासाठी गेलो होते. कंत्राटदाराने सांगितलेल्या ठिकाणी म्हशीला घेऊन जात होतो असं तो वारंवार सांगत असताना गावकरी मात्र त्याचा दावा फेटाळून लावत होते.

दुसऱ्या एक व्हिडीओत पोलीस गावकऱ्यांना कायदा हातात न घेता चौघांना आपल्या ताब्यात देण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. यावेळी गावकरी पोलिसांवरदेखील आरडाओरड करत होते. अखेर पोलिसांनी चौघांची सुटका करण्यात यश मिळालं. यानंतर पोलिसांनी म्हशीच्या मालकाशी संपर्क साधला.

‘चौघांकडे मृत जनावरांची वाहतूक करण्याचा परवाना आहे. आम्ही तपास करत आहोत. दोषी आढळल्यास गावकऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल’, अशी माहिती पोलीस अधिकारी सिद्धार्थ वर्मा यांनी दिली आहे.