पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर जिल्ह्यामध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील चार व्यक्तींना करोनाची चाचणी न करताच करोना पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे. गोवलपोखोर-२ ब्लॉकअंतर्गत येणाऱ्या बिलोन गावामध्ये हा विचित्र प्रकार घडला असून यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.

११ ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या आरोग्या खात्याने करोनाच्या आरटी-पीसीआर चाचण्या घेतल्या होत्या. कम्युनिटी ट्रान्समिशन झालं आहे की नाही ते तपासून पाहण्यासाठी आरोग्या खात्याच्या कर्मचाऱ्यांनी रॅण्डम सॅम्पलिंग पद्धतीने काही जणांच्या चाचण्या घेतल्या. यासाठी ग्रामपंचायतीने ८० गावकऱ्यांची यादी आरोग्य खात्याला दिली होती. या यादीपैकी ७३ जणांचा स्वॅब घेण्यात आला. मात्र १४ ऑगस्ट रोजी या चाचण्यांचा निकाल समोर आला त्यावेळी चाचणी न केलेल्या सात जणांपैकी चौघांचे रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आल्याचं ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. यामुळे आता चाचणीच झाली नाही करत करोना चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह कसा आला यावरुन सर्वचजण संभ्रमात पडले आहेत.

“करोना चाचणी न झालेले चारजण पॉझिटिव्ह आले आहेत. हे चारही जण चापोरचे रहिवाशी आहेत. आम्हाला त्यांची तक्रार मिळाली आहे. माझ्यामते या चाचण्या योग्य पद्धतीने घेण्यात आल्या नाहीत. या चाचण्यांमध्ये काहीतरी दोष असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ८० पैकी काहीजणांनी रॅण्डमली करोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आल्यासारखं वाटत आहे,” असं मत ग्रामपंचायतीचे सदस्य असणाऱ्या तैफ आलम यांनी व्यक्त केलं आहे. या ८० जणांच्या यादीमध्ये समावेश असलेल्या मात्र चाचणी न झालेल्या हारुन रशीद यानेही त्याच्या चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. “ज्या दिवशी चाचणी घेण्यात आली तेव्हा मी चाचणी केंद्रासमोर मोठी रांग बघितल्याने चाचणी न करताच घरी परत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतरही अहवालामध्ये मी करोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आलं आहे. हे खोटं आहे,” असं रशीदने ‘इंडिया टूडे’ टीव्हीशी बोलताना सांगितलं.

रामपूरमध्ये राहणाऱ्या सुरज आलम यानेही या चाचण्यांच्या निकालाबद्दल आक्षेप व्यक्त केला आहे. “मी जर चाचणीच करुन घेतली नाही तर ते चाचणीचा अहवाल कसा काय देऊ शकतात?,” असा प्रश्न सुरजने विचारला आहे. चाचणी झाली त्या दिवशी कामानिमित्त आपण कांडी येथे गेलो होतो असं सुरजने स्पष्ट केलं आहे. “या चाचण्यामध्ये कमाईचा उद्योग झाला आहे का?, करोनाच्या नावाखाली त्यांना पैसे कमावचे आहेत,” असा आरोपही सुरजने केला आहे.

“या प्रकरणाची चौकशी सुरु असून मी त्यावर लक्ष ठेऊन आहे,” असं जिल्ह्याचे मुख्य आरोग्य अधिकारी असणाऱ्या रबिंद्रनाथ प्रधान यांनी सांगितलं आहे.