श्रीनगर : पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी शोपियन जिल्ह्य़ातील तपासणी ठाण्यावर केलेल्या हल्ल्यात मंगळवारी चार पोलीस शहीद झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दहशतवाद्यांनी पोलिसांकडील तीन रायफलीही हिसकावून घेतल्या आणि ते पसार झाले.

काश्मिरी पंडितांची सहा कुटुंबे वास्तव्याला असलेल्या ठिकाणी चार पोलीस पहारा देत असताना मंगळवारी दुपारी हा हल्ला करण्यात आला.

माजी विशेष पोलीस अधिकारी आदिल बशीर हा पीडीपीच्या आमदाराकडून आठ शस्त्रे घेऊन ऑक्टोबर महिन्यात पसार झाला होता तो या हल्ल्याचा म्होरक्या होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारामध्ये तीन पोलीस जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. अब्दुल माजिद, मंझूर अहमद आणि मोहम्मद अमिन अशी शहीद झालेल्या पोलिसांची नावे आहेत. जखमी पोलिसाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, मात्र तेथे तो मरण पावला.

या घटनेनंतर परिसराला वेढा घालण्यात आला असून दहशतवाद्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. या हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची माहिती मिळाली आहे.